रंगबदलू गिरगिटची नंदुरबारकरांना भुरळ 

chameleons change color
chameleons change color

तळोदा : नंदुरबार शहरात दुर्मिळ रंगबदलू गिरगिट अर्थात सरडा आढळला असून, त्याला पाहण्यासाठी प्राणीप्रेमींनी गर्दी केली होती. इंग्रजीत ‘शमिलियन’ असे म्हटले जाणाऱ्या या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्या त्वचेचा रंग बदलू शकतो. त्यामुळे त्याला ‘रंगबदलू गिरगिट’ असेदेखील म्हणतात. धुळे रस्त्यावरील संजय टाउन हॉलसमोरील मुख्य रस्त्यावर तो फिरताना दिसल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली होती. 
शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास रस्त्याच्या मध्यभागी पोपटासारखा हिरवा, तर कधी काळसर असा रंग बदलत फिरत असलेला हा सरडा काही जणांच्या नजरेस पडला. सरडे भरपूर पाहिले परंतु असा रंग बदलणारा सरडा प्रथमच पाहिल्याने नागरिकांनी त्याच्या हालचाली टिपण्यासाठी गर्दी केली. मात्र, तो तेवढ्या परिसरातच फिरत असल्याने एका युवकाने त्याला जवळच असलेल्या स्वत:च्या कार्यालयाजवळ नेले. दिवसभर ठेवल्यानंतर रात्री त्याला शहराबाहेर जंगलात नेऊन सोडून दिले. प्राण्यांच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार नंदुरबार परिसरासाठी हा दुर्मिळ सरडा आहे. त्याच्या रंग बदलण्याच्या लीला सर्वांना चकित करत होत्या. पूर्वी नवापूर तालुक्याचा जंगलात त्याचे अस्तित्व जास्त प्रमाणात होते, असे सांगण्यात येते. 

शमिलियनची वैशिष्ट्ये 
शमिलियन हा एक सरपटणारा सरडा असून, तो आपल्या त्वचेचा रंग बदलू शकतो. या शमिलियन सरड्याच्या सुमारे दोनशे प्रजाती आढळतात. त्यांचे आकारदेखील विविध असतात. सर्वांत मोठा सरडा पार्सनचा शमिलियन आहे. तो २७ इंचांपर्यंत लांब असू शकतो. त्यानंतर मादागास्कर शमिलियन सरडा जो २३ इंच लांब असतो. सर्वांत लहान शमिलियन सरडा फक्त अर्धा इंच, म्हणजेच १६ मिलिमीटर लांब असतो. त्यात हा आयुष्यभर वाढणारा प्राणी असून, जसे त्याचे वय होते तशी त्याची त्वचा तोकडी पडते व ती तुकड्या-तुकड्याने झडते. 

रंग बदलणारा प्राणी 
जसे साप आपली त्वचा (कात) एकदमच काढू शकतो, तसे शमिलियनला मात्र करता येत नाही. भावनानुरूप आपल्या त्वचेचा रंग बदलवता येतो. संताप, भीती, आर्द्रता, प्रकाश, तापमान यानुसार त्याची त्वचा प्रतिसाद देऊन बदलते. जितका उजळ भडक रंग तितका प्रभावी असतो. मादी मात्र नराचा स्वीकार किंवा नकार दर्शविण्यासाठी रंग बदलते. नवीन अभ्यासानुसार इरिडोफर पेशीद्वारे जलदपणे आपले त्वचेचे रंग बदलू शकतो. 

हिरव्या झुडपात वास्तव्य 
शमिलियन बहुतेक झुडपांमध्ये किंवा झाडांवर राहतात. काही प्रजाती जमिनीवरदेखील आढळतात. याचे वैशिष्ट्य असे की त्याचा त्वचेचा रंग बदलतो. मात्र डोळे स्वतंत्रपणे फिरू शकतात. दुसरा कुठलाही प्राणी असे डोळे फिरवू शकत नाही. ते किडे, पक्षी खातात व खूप संथपणे भक्ष्याच्या जवळ जातात. आपल्या जिभेने लांबूनच कीटकाला पकडतात. जीभ शरीराच्या दुप्पट लांबीची असते. 

अन्य वैशिष्ट्ये... 
- आययूसीएनच्या रेड लिस्टमध्ये शमिलियन सरड्याचा समावेश होतो. यातील सुमारे २०० प्रजातींपैकी ७७ प्रजाती अति संकटग्रस्त आहेत. काही तर अस्तंगत होण्याच्या वाटेवर आहेत. त्यात टायगर शमिलीऑन, एलडान्सबर्ग डावर्फ व डेकारीचा वर्ण हे विलुप्त होण्याच्या बेतात आहेत. 
- जगातील माहीत असलेल्या २०० प्रजातींपैकी जवळपास ४४ टक्के प्रजाती मादागास्करमध्ये आढळतात. 
- २०१२ मध्ये ब्रोकेशिया मायक्रा हा जगातील सर्वांत लहान सरडा संशोधकांना आढळला होता. 
- हे प्राणी संवादासाठी व शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी त्वचेचे रंग बदलतात. त्वचेला चमक येऊन ते स्वतःला थंड ठेवतात. 
- शत्रूपासून संरक्षणासाठी शेपूट तुटले तरी ते पुन्हा पालीप्रमाणे वाढत नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com