प्रकल्प झाले ओव्हरफ्लो; गळती मात्र ‘जैसे थे’ 

taloda project overflowed
taloda project overflowed

तळोदा (नंदुरबार) : तळोदा तालुक्यातील लघुसिंचन प्रकल्प यंदाच्या पावसात ‘ओव्हरफ्लो’ झाले असून पाण्याचा साठा जमा झाला आहे. मात्र रोझवा, पाडळपूर या सिंचन प्रकल्पांची गळती यंदाही ‘जैसे थे’च राहिल्याने हा पाणीसाठा किती दिवस टिकतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. दरम्यान सिंचन प्रकल्पांच्या भिंतींना गेलेले तडे व नादुरुस्त झालेले जॅकवेल पावसाळ्याआधी दुरुस्त झाले नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

तळोदा तालुक्यात गढवली, रोझवा, पाडळपूर, सिंगसपुर व धनपूर हे लघुसिंचन प्रकल्प आहेत. तालुक्यात यंदा तीन सप्टेंबरपर्यंत तळोदा मंडळात ८९८ मिलीमीटर, बोरद मंडळात ७६७ मिमी, प्रतापपूर मंडळात ८३२ मिमी, तर सोमावल मंडळात ९५८ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हे पाचही प्रकल्प शंभर टक्के भरून प्रकल्पाचा सांडव्यावरून पाणी वाहत आहे. यामुळे पाणी जमिनीत जिरून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यात या प्रकल्पांमुळे तालुक्‍यातील सुमारे १२०० हेक्टर जमीन ओलिताखाली येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा नेहमी या सिंचन प्रकल्पांच्या पाणी साठ्यावर असतात. 

प्रकल्पांचे पाणी कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम भूजलावर होतो. त्यात तालुक्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे शेतीचे सिंचन भूजलावर अवलंबून आहे. त्यात कूपनलिकांची पातळी खोल गेल्यास शेतीला पाणी देणे शेतकऱ्यांना जिकिरीचे जाते. त्यामुळे तालुक्यात पाणी अडवणे गरजेचे आहे. दुसरीकडे मात्र सिंचन प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाणी वाहत असले तरी रोझवा, पाडळपूर या प्रकल्पांचे जॅकवेल नादुरुस्त आहेत. त्यामुळे अहोरात्र या जॅकवेल मधून पाण्याची गळती होत राहते. या प्रकल्पांच्या सांडव्यांचा भिंतींना देखील तडे गेलेले असल्याने त्यामधून देखील गळती होते. येथील पाणीसाठा वर्षभर टिकत नसल्याची परिस्थिती दरवर्षी उद्भवते. 
 
प्रकल्पाची दुरुस्ती होणार कधी? 
पावसाळ्याआधी रोझवा व गढवली प्रकल्पासाठी दुरुस्तीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने पाठवला होता. मात्र दुरुस्ती झालीच नाही. त्यामुळे बारा महिने साठा टिकण्यासाठी येथील गळती केव्हा थांबणार असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. दुसरीकडे राज्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर येथील सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र त्या सर्वेक्षणाचा देखील काही उपयोग झाला नाही अशीच येथील परिस्थिती आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com