अन विद्यार्थी, पालक ही म्हणू लागले  "व्हॉट अँन आयडिया सरजी"

अन विद्यार्थी, पालक ही म्हणू लागले  "व्हॉट अँन आयडिया सरजी"
Updated on

तळोदा : 'इच्छा तिथे मार्ग' या म्हणीनुसार धवळीविहिर ( ता. तळोदा ) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी कोरोनाचा काळात शाळा जरी बंद असली तरी विविध अभिनव उपक्रम राबवित आलेल्या समस्यांवर मात करीत, शाळेतील विद्यार्थी कोरोनाचा काळात देखील शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न चालविला आहे. विद्यार्थी, पालकवर्ग देखील "व्हॉट अँन आयडिया सरजी" म्हणत शिक्षकांचा उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

कोरोनामुळे शाळा बंद आहेत परंतु शिक्षणाची प्रक्रिया पूर्णपणे बंद होऊ नये व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची टिकून राहावी यासाठी शिक्षण विभाग मुख्यतः ऑनलाईन शिक्षणासह अनेक उपाययोजना राबवित आहे. पण ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात राबवितांना अनेक अडचणी येत आहेत, या भागातील बहुतांशी मुलांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत किंवा मोबाईल आहेत तर त्याला इंटरनेटची रेंजचं नाही. यावर उपाय म्हणून धवळीविहिर ( ता. तळोदा ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी ध्वनिफिती द्वारे विद्यार्थ्यांना अनौपचारिक पणे शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचे ठरविले आहे. यासाठी शाळेतील शिक्षक अनिल सोनवणे यांनी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या कविता, समूह गीते, पाढे, मराठी व इंग्रजी अंक, बारा महिने, सात वार सोबत प्रतिज्ञा, प्रार्थना, प्रास्ताविक व इतर घटकांची दोन तास सतरा मिनिटांची ऑडिओ क्लिप तयार केली आहे. धवळीविहिर येथील मुख्य चौकात एक मोठा स्पिकर ठेवून त्याद्वारे ती क्लिप विद्यार्थ्यांना ऐकविण्यात येत आहे, विद्यार्थीही कोरोनाचा पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत ती क्लिप आवडीने श्रवण करीत आहेत. पालकवर्ग, गावकरी, मुख्याध्यापक प्रताप वळवी, केंद्रप्रमुख अलका जयस्वाल व गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे.

वाचा: नंदुरबारात विशेष मोहीम; सात लाख जनावरांना लाळखुरकत प्रतिबंधक लसीकरण  

चौकात लहान-लहान मोबाईल स्पीकर 
यापुढे गावांतील इतर चौकात देखील लहान - लहान मोबाईल स्पीकर लावण्यात येणार असून त्यासाठी लोक सहभागातून लहान स्पीकर खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांपर्यंत अनौपचारिकरीत्या पोहचून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवण्याचा हा अनोखा प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगा आहे....

गावांतील भिंती ज्ञानाने रंगल्या 
सामान्यतः गावांतील सार्वजनिक ठिकाणीच्या भिंती तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या असतात. पण धवळीविहिर गावांतील भिंतींवर स्वतः शिक्षक अनिल सोनवणे यांनी गणिताच्या संकल्पना, विविध पक्षींची व फळांची इंग्रजी भाषेतील नावं व त्यांचा अर्थ सुबक अश्या चित्रांसह रेखाटला आहे. यामुळे गावांतील भिंती बोलक्या झाल्या असून यामुळे गावातील मुलांचा चालता - बोलता अभ्यास होत आहे....

विविध उपक्रम राबवितांना माजी विद्यार्थिनी गीता पाडवी, जितेंद्र पावरा, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश पावरा आदींची मदत मिळत असून गावातील विद्यार्थी, पालकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यात यशस्वी होत आहोत याचा आनंद आहे.
- अनिल सोनवणे, शिक्षक, जि. प. शाळा, धवळीविहिर.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com