नागरिकांचा आला मोर्चा...मग काय...नगरसेवकाने केले "शोले' स्टाईल आंदोलन 

नागरिकांचा आला मोर्चा...मग काय...नगरसेवकाने केले "शोले' स्टाईल आंदोलन 

धुळे : जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसानंतर जलाशयांमध्ये मुबलक साठा आहे. त्यास महापालिका क्षेत्र अपवाद नाही. मात्र, केवळ नियोजन शून्य कारभार आणि हितसंबंधांसह मनधरणीतून वाटेल त्या भागात पाणी सोडले जात असल्याने लाखावर लोकसंख्या असलेल्या देवपूरवासीयांचा घसा कोरडाच राहात आहे. त्यामुळे प्रभाग तीनमधील संतप्त रहिवाशांनी नगरसेवकांच्या घरावर मोर्चा काढत त्यांना यथेच्छ शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त "एमआयएम'च्या नगरसेवकांनी निष्क्रिय महापालिकेविरोधात नवरंग जलकुंभावर चढत आज शोले स्टाइल आंदोलन केले. 

देवपूरमध्ये प्रभाग क्रमांक तीन आहे. तेथे "एमआयएम'चे नगरसेवक सईद बेग मिर्झा, केसर अहमद, अब्दुल गनी डॉलर आणि कॉंग्रेसचे सुभाष जगताप प्रतिनिधित्व करतात. या प्रभागात सात दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळते. तेही तासभर असते. मात्र, गेल्या नऊ दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने काही भागातील रहिवासी नागरिकांचा संयम सुटला. त्यांनी नगरसेवकांच्या घरावर मोर्चा काढण्यास सुरवात केली. तसेच संतापात नगरसेवकांना शिवीगाळही केली. नऊ- नऊ दिवस पाणी देऊ शकत नसाल, प्रश्‍न सोडवू शकत नसाल तर मते का मागितली, अशा शब्दात त्रस्त नागरिक नगरसेवकांची खरडपट्टी काढत आहेत. 

या प्रकारामुळे प्रभाग तीनमधील संतप्त तीन नगरसेवकांनी सकाळी नवरंग जलकुंभावर चढाई केली. प्रश्‍न मार्गी लागल्याशिवाय, पाणी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. ही माहिती मिळताच महापालिकेचे अभियंता कैलास शिंदे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांच्यावर त्रस्त रहिवाशांनी प्रश्‍नांचा भडिमार केला. पंपिंग स्टेशनवर वीज पुरवठा खंडित झाल्याने नवरंग जलकुंभ भरला गेला नाही. वीज कंपनी पूर्वसूचना देत नसल्याने पुरवठा खंडित होतो व त्याचा परिणाम जलकुंभावर होतो. यासंदर्भात नाशिकस्थित वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली आहे. एक्‍स्प्रेस फिडर असूनही वीज पुरवठा खंडित होत असल्याने जलकुंभ भरले जात नाही. परिणामी, प्रभाग तीनमध्ये पाणीपुरवठ्यास विलंब झाल्याची माहिती अभियंता शिंदे यांनी दिली. हे प्रश्‍न मार्गी लावले जातील, असे आश्‍वासन त्यांनी दिल्यावर आंदोलक जलकुंभावरून उतरले. महापालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर नगरसेवक, त्रस्त रहिवाशांनी आगपाखड केली. त्यावर अधिकारी गप्प राहिले. वीज कंपनीच्या कारभारावर खापर फोडून त्यांनी सुटका करून घेतली. 

पाणी सोडण्यात "गडबड'; हेच खरे कारण..
हितसंबंधी व्यक्तीचा दूरध्वनी आला की मनपाचे काही अधिकारी, कर्मचारी कम नगरसेवक लागलीच "त्या' भागात पाणीपुरवठा करतात. वरखेडी, जुनेधुळेसह विविध भागात पाणीपुरवठा केला जात असल्याने देवपूरवासीयांना प्रसंगी आठवड्याभरात पाणीच मिळत नाही. वाटेल तिथे पाणी सोडले जात असल्याने देवपूरमधील पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळित होते. त्यात भारनियमनाची भर पडत असल्याने पाणीपुरवठ्याचा खोळंबा होतो. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत प्रक्रियेच्या सखोल चौकशीची मागणी होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com