Dhule-Mahanagarpalika
Dhule-Mahanagarpalika

शहर झगमगणार, दोन कोटीही वाचणार; कसे ? 

धुळे ः महापालिका हद्दीतील शहर भाग, तसेच देवपूर भागात एलईडी पथदीप बसविण्याचे काम दर करार पद्धतीने देण्यास मंजुरी स्थायी समितीच्या सभेत देण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण शहरात एलईडी पथदीप लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

संपूर्ण शहरात एलईडी पथदीप बसविण्याचा प्रश्‍न अखेर साधारण वर्षभरानंतर मंगळवारी स्थायी समिती सभेत मार्गी लागला. दरम्यान महापालिका सभेतही कचरा संकलनासाठी घंटागाड्या येत नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त करत जाब विचारला. 

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी  सभागृहात झाली. सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त शांताराम गोसावी, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. महापालिका हद्दीतील शहर भाग तसेच देवपूर भागात जुने पथदीप काढून नवीन एलईडी पथदीप बसविणे, तसेच आवश्यकतेप्रमाणे गर्डर पोल, स्ट्रीट लाइटर कंडक्टर, केबल वायर, टायमर कॉन्ट्रॅक्टर, स्ट्रीट लाइट कंट्रोल पॅनल व इतर संबंधित विद्युत साहित्य बसविण्याबाबत निविदा दर मागविण्यात आले, त्यावर विचार करण्याचा विषय समितीपुढे होता. 
 

साडेदहा कोटींवर खर्च 
संपूर्ण शहरात एलईडी पथदीप बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ ला महासभेने एकूण दहा कोटी ६५ लाख ८० हजार ६७२ रुपये खर्चास आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली होती. विविध कारणांनी हा विषय मागे पडत राहिला. या खर्चातून पांझरा नदीच्या उत्तरेकडील (देवपूर) व नदीच्या दक्षिणेकडील (उर्वरित शहर) भागासाठी निविदा काढण्याचे ठरले होते. त्यानुसार निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. निकषपात्र ठरलेल्या मे. वल्लभ इलेक्ट्रिकल्स, व्ही. यू. नगर (जि. आनंद, गुजरात) या कंत्राटदाराला हे काम देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. 


सव्वादोन कोटी वाचणार 
संपूर्ण शहरात एलईडी पथदीप बसविल्यानंतर महापालिकेच्या पथदीपांच्या वीजबिलात मोठी बचत होणार आहे. सद्यःस्थितीत पथदीपांचे वीजबिल दरमहा ३८-४० लाख रुपये येते. एलईडी पथदीप बसविल्यानंतर वीजबिलात दरमहा १८ लाख रुपये अर्थात वर्षाला साधारण दोन ते सव्वादोन कोटी रुपयांची बचत होईल, असे विद्युत विभागाचे अभियंता एन. के. बागूल यांनी सांगितले. 

आवर्जून वाचा- झटपट श्रीमंतीच्या नादात अनेक तरुण लागले गैरमार्गाला

घंटागाडीप्रश्‍नी भाजप बदनाम 
सदस्य युवराज पाटील, अमोल मासुळे, संतोष खताळ, सईद बेग हाशम बेग आदींनी प्रभागांमध्ये १५-१५ दिवस घंटागाडी येत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. कचरा संकलनप्रश्‍नी निगरगट्ट, गेंड्याच्या कातडीचे हे शब्दप्रयोगही कमी पडावेत, अशी अधिकाऱ्यांची कार्यपद्धती आहे. घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे का? अधिकाऱ्यांना ठेकेदाराचे बिल काढून टक्केवारी घेणे एवढेच काम आहे. कचरा संकलनप्रश्‍नी सत्ताधारी म्हणून भाजप बदनाम होत आहे, असा संताप सदस्यांनी व्यक्त केला.  

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com