esakal | दर तासांनी पाण्यासाठी वाजतेय बेल! 
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar water bell school

दर तासांनी पाण्यासाठी वाजतेय बेल! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : शरीराला आवश्‍यक असलेले पाणी मिळालेच पाहिजे, अन्यथा आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होतात. विशेषतः मुलांमध्ये हे प्रमाण अधिक दिसते. विद्यार्थ्यांना बालपणापासूनच पाणी पिण्याची सवय लागावी म्हणून येथील प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्या मंदिरात ‘वॉटर बेल' हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. केरळनंतर महाराष्ट्रात असा उपक्रम राबविणारी कदाचित ही शाळा पहिलीच असावी. 

मानवी शरीररचनेनुसार पाणी केवळ तहान भागविणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही तर त्याच्या कमतरतेमुळे सर्वसाधारण डिहायड्रेशन होणे, थकवा वाटणे, चक्कर येणे, मुत्रमार्गातील संसर्ग, ॲसिडिटी, अपचन यासह विविध समस्या उद्भवतात. त्यामुळे माणसाने पाणी पिणे आवश्‍यक आहे. 

मुले शाळेत जातात, त्यावेळी आईवडिल जेवणाच्या डब्यासोबतच वॉटर बॅग भरून दिली जाते. ती विद्यार्थी शाळेत नेतातही. मात्र शाळेच्या वेळेत विद्यार्थी ती अर्धीही संपवित नाही. काही विद्यार्थ्यांची वॉटर बॅग भरलेलीच घरी येते. अनेक पालक याची साधी चौकशीही करीत नाही. त्यामुळे बालवयात मुलांना अनेक आरोग्याचा समस्या उद्भवतात. 

केरळने राबविला उपक्रम 
केरळ राज्यातील एका शाळेने विद्यार्थ्यांचा पाणी पिण्याचा प्रश्‍न गांर्भीयाने घेतला आहे. त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांना काही ठराविक तासानंतर शिकविणे थांबवून सामूहिकरीत्या दोन मिनिटे पाणी पिण्यासाठी सुट्टी द्यायचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय यशस्वी झाल्याने राज्यभर त्याचे अनुकरण सुरू झाले आहे. त्याला वॉटर बेल असे नाव देण्यात आले आहे. काही तासांनी केवळ दोन तीन मिनिटासाठी बेल द्यायची व पाणी पिण्यास सांगायचे असे त्या उपक्रमाचे स्वरूप आहे. 

प्यारीबाई विद्या मंदिरात सुरू 
धुळे येथील वे. खा. भगिनी सेवा मंडळ संचलित येथील प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिरात केरळच्या धर्तीवर मुलांना पाणी पिण्यासाठी वाजतेय 'वॉटर बेल'. या उपक्रमास मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन रोज पाणी प्याल्याने होणारे फायदे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणलेल्या बॉटलमधील पाणी रोज नियमित पिण्यासाठी ठराविक वेळेस तीनदा विद्यार्थ्यांना दोन मिनिटांची विश्रांती दिली जाते. त्या वेळेत विद्यार्थी निवांतपणे बसून पाण्याची बॉटल काढून पाणी पितात. दोन दिवसापूर्वीच हा उपक्रम सुरू झाला, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

केरळमधील उपक्रमाची माहिती वाचल्यानंतर सहकारी शिक्षकांशी चर्चा केली. सर्वांना आनंद व्यक्त करीत हा उपक्रम सुरू केला. खरे तर दिवसातून २ ते ३ लीटर पाणी प्यायला हवे.म्हणून आम्ही वॉटर बेल उपक्रम सुरू केला आहे. 
- राहुल मोरे, मुख्याध्यापक प्यारीबाई ओसवाल विद्या मंदिर ,नंदुरबार