esakal | महावितरणचा अजब प्रकार; वीज जोडणी नसतानाही शेतकऱ्याला १० हजाराचे बिल!

बोलून बातमी शोधा

MSEB gives high amount bill to the farmer
महावितरणचा अजब प्रकार; वीज जोडणी नसतानाही शेतकऱ्याला १० हजाराचे बिल!
sakal_logo
By
- संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : एक तर दहा वर्षांनंतर वीजजोडणीसाठी रोहित्र दिले; पण तेही नादुरुस्त निघाले. त्यानंतर अनेकदा वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्याने चकरा मारल्या. मात्र, रोहित्र राहिले बाजूला, पण वीजजोडणी नसताना हातात पडले भल्या मोठे रकमेचे बिल! हा अजब प्रकार घडला आहे डोंगरगाव येथील शेतकरी रंजक महाराज ढोकळे यांच्याबाबतीत.

कनेक्शनचं नाही तर बिल कसले?

२०१० मध्ये डोंगरगाव येथील शेतकरी ढोकळे यांनी शेतीत नवीन वीजजोडणीसाठी चार हजार ६०० रुपयांचे कोटेशन शुल्क भरून महावितरणकडे अर्ज केला होता. त्या नंतर गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये म्हणजे तब्बल दहा वर्षांनी त्यांच्या माळावरील शेतात महावितरणने नवीन जोडणीसाठी डी. पी. बसवून दिली. मात्र, सदर डी. पी. सोबत असलेला ट्रान्स्फॉर्मर हा फॉल्टी निघाला. हा खराब ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त न केल्याने आजपर्यंत सदर डी. पी. ला वीज सप्लाय दिलाच गेलेला नाही. संबंधित ट्रान्स्फॉर्मर बदलून मिळावा म्हणून रंजक ढोकळे यांनी येवला येथील महावितरणच्या कार्यालयात चकरा मारत उंबरठे झिजविले. मात्र, महावितरणने कोणतीही कारवाई केली नाही. रंजक ढोकळे मागील महिन्यात पुन्हा एकदा महावितरणच्या येवला येथील उपविभागीय कार्यालयात गेले असता, त्यांच्या हातावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चक्क नऊ हजार ७१० रुपयांचे बिल थोपवले व संबंधित रक्कम भरल्याशिवाय आपल्याला नवीन ट्रान्स्फॉर्मर देणार नाही, असे सांगितले.

हेही वाचा: Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

शेतकरी पुत्राने बजावली महावितरणला नोटीस

मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या त्यांच्या मुलाला या प्रकाराची माहिती मिळताच वकील एकनाथ ढोकळे यांनी महावितरणला तब्बल पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. सदर नोटिसीत म्हटले आहे, की अर्ज केल्यानंतर व कोटेशन भरल्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतरही योग्य वीजजोडणी न देणे, वीज सप्लाय नसलेल्या मीटरचे बिल काढून शेतकऱ्याला हैराण करणे हे कृत्य ग्राहक म्हणून शेतकरीहिताविरोधी असून, ग्राहक संरक्षक कायद्यांतर्गत नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे. सदर नोटिशीची बजावणी महावितरणच्या येवला येथील उपविभागीय कार्यालयास ई -मेल व व्हॉट्सॲप करण्यात आली असून, महावितरणला १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या काळात जर महावितरणने नुकसानभरपाईची मागणी पूर्ण केली नाही, तर ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याचे ढोकळे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या बाबतीत असे चुकीचे प्रकार नेहमीच होतात. महावितरणने तर ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांना वीजजोडण्यासाठी प्रतीक्षेत ठेवले आहे, असे असूनही बिल पाठवणे चुकीचे आहे. माझ्या बाबतीत हा प्रकार झाला तो इतरांच्या बाबतीत होऊ नये म्हणून कायदेशीर नोटीस पाठविली आहे. -ॲड. एकनाथ ढोकळे, डोंगरगाव

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..