Nashik News : उसाच्या शेतात आढळले 2 बछडे; मादीने नेले सुरक्षित ठिकाणी, घटना CCTVमध्ये कैद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV Footage

Nashik News : उसाच्या शेतात आढळले 2 बछडे! मादीने नेले सुरक्षित ठिकाणी, घटना CCTVमध्ये कैद

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ गावाच्या शिवारात ऊस तोडणी कामगारांना उसाच्या शेतामध्ये बिबट्याची दोन नवजात बछडे मंगळवारी सकाळी आढळून आली. ऊस तोडणीचे काम थांबवत या बछड्यांना त्यांच्या मातेकडे स्वाधीन करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने नियोजन केले.

मात्र त्या दिवशी सायंकाळी मादी बिबट्याने केवळ एकच बछडे नेले. तर दुसऱ्या बछड्याला मात्र आईच्या कुशीत जाण्यासाठी बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तब्बल 30 तास प्रतीक्षा करावी लागली. यादरम्यान बुधवारी दिवसभर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बछड्याची सुरक्षित हाताळणी करत त्याची काळजी घेतली. (2 calves found in sugarcane field taken to safety by female leopard incident captured on CCTV at sinnar Nashik News)

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रदीप आढाव यांच्या शेतात ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना बिबट्याची दोन नवजात बछडे आढळली. याबाबत त्यांनी श्री. आढाव यांना माहिती देत ऊस तोडणीचे काम थांबवले.

वनपाल अनिल साळवे यांना याबाबत कळवल्यावर त्यांनी तातडीने मऱ्हळ येथे धाव घेतली. नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांना या संदर्भात कळवल्यावर सदर बछडे त्यांच्या आईकडे सुरक्षित पोहोचवण्यासाठी ऑपरेशन राबवले गेले.

बछडे आढळलेला भाग निर्मनुष्य करण्यात आला. ज्या ठिकाणी बछडे आढळले त्या ठिकाणी नैसर्गिक परिस्थितीत चिपाडामध्ये ते सुरक्षित ठेवण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले.

दिवसभर आपल्या बछड्यांकडे न फिरकलेली मादी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कॅमेऱ्याच्या टप्प्यात आली होती. तिने आजूबाजूचा अंदाज घेत एक बछडे तोंडात पकडले व त्याला उसाच्या शेतात आत मध्ये घेऊन गेली.

कदाचित या बछड्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून ती दुसऱ्या बछड्याला न्यायला येईल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र रात्रीचे दीड वाजले तरी ही मादी माघारी परतली नव्हती. वनपाल साळवे व त्यांचे सहकारी रात्रभर डोळ्यात तेल घालून या मादीची प्रतीक्षा करत होते.

दुसऱ्या दिवशी बुधवारी पहाटेचे सहा वाजले तरी बछडे आईविना त्याच जागेवर असल्याने सर्वांची चिंता वाढली होती. रात्रभर आपल्या बछड्याकडे न फिरकलेली मादी नेमकी गेली कुठे हा प्रश्न होता.

ऊन वाढू लागले तसे या नवजात बछड्याची कालवाकालव सुरू झाली होती. अवघे 10 दिवस वय असलेल्या या बछड्याला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांची संघटना असलेल्या इकोइको ग्रुपच्या मदतीने सुरक्षित हाताळणी करत श्री. साळवे यांनी नांदूर शिंगोटे येथे वनविभागाच्या कार्यालयात हलवले.

या ठिकाणी सदर बछड्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास दूध पाजण्यात आले. मानवी स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने या बछड्यास हाताळण्यात आले. त्यासाठी हाताळणी करताना वारंवार हँड ग्लोज बदल्यात आले.

बुधवारी सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत देखील बिबट्या मादी उसाच्या शेताकडे आपल्या पिल्लास शोधायला फिरकली नव्हती. ती कदाचित मंगळवारी आलेल्या वेळेलाच पुन्हा येईल असा अंदाज बांधत श्री. साळवे यांनी साडेचार वाजेच्या सुमारास सदर बछडे पुन्हा उसाच्या शेतात आणले.

प्लास्टिकच्या क्रेटमध्ये या बछड्याला सुरक्षित ठेवून सर्वजण मादीची वाट बघू लागले. आणि बरोबर साडेपाच वाजेच्या ठोक्याला उसाच्या शेतातून मादी प्लास्टिक क्रेट जवळ आली. तिची चाहूल लागल्यावर बछड्याने देखील म्याऊचा आवाज दिला. आणि तब्बल दोन दिवस दूर असलेले हे बछडे मादीने अलगदपणे उचलत सुरक्षित ठिकाणी नेले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

अवघ्या काही सेकंदांचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. तब्बल 30 तासांच्या प्रतीक्षेनंतर नंतर दोनही बछडे त्यांच्या आईने सुरक्षित ठिकाणी नेल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मंगळवारी पहाटेच्या वेळी मादी आपल्या बछड्यांना सोडून अन्नाच्या शोधात गेली असावी. मात्र ऊस तोडणी कामगारांची व त्यानंतर बघ्यांची वर्दळ सुरू झाल्याने ती बछड्यांपासून दिवासभर दूरच राहिली.

"मंगळवारी सायंकाळी एक बछडे नेल्यावर आम्ही तिची रात्रभर वाट बघितली. मात्र ती दुसऱ्या बछड्याकडे फिरकली नव्हती. दिवस उजाडल्यावर चिंता वाढु लागली. नवजात बछड्याची उपासमार झाली तर काय करायचे हा प्रश्न सतावत होता. मात्र वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी चार वाजेपर्यंत या बछड्याची काळजी घेतली. आणि सायंकाळी साडेपाच वाजता या बछड्यास त्याच्या आईने सुरक्षित ठिकाणी नेले. या बछड्यास हाताळताना मानवी स्पर्श झाला असता तर मादीने त्याला दुर्लक्षित केले असते. त्यामुळे ही संपूर्ण हाताळणी अतिशय काळजीपूर्वक करण्यात आली होती." - अनिल साळवे (वनपाल, नांदूर शिंगोटे उपक्षेत्र)

टॅग्स :NashikLeopardSinnar