esakal | एप्रिल महिना ठरला जीवघेणा! कोरोनामुळे निफाड तालुक्यात २५० जणांचे थांबले श्‍वास

बोलून बातमी शोधा

Death Corona Virus
एप्रिल महिना ठरला जीवघेणा! कोरोनामुळे निफाड तालुक्यात २५० जणांचे थांबले श्‍वास
sakal_logo
By
दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : एप्रिल महिना निफाड तालुक्यासाठी जीवघेणा ठरला आहे. अवघ्या तीस दिवसात तब्बल २४७ कोरोनाबाधितांचे श्‍वास कायमचे थांबले आहेत. कोरोनाचे प्रमुख केंद्र ठरलेल्या निफाड तालुक्यात एप्रिलमध्ये मोठी उसळी घेतली. एका दिवसाला किमान ३०० नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकले असून, सरासरी आठ जणांचा जीव गमावला आहे. एप्रिलमध्ये तब्बल साडेआठ हजार रुग्ण आढळले आहे.

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण निफाड तालुक्यात आढळला. चोर पावलांनी प्रवेश केलेल्या कोरोनाने राक्षसाचे रूप धारण केले आहे. सुरवातीला बोटावर मोजण्याएवढी संख्या आता दररोज त्रिशतकी असून, मुत्यूची आकडेही धडकी भरवित आहे. शहरासह खेड्यातही कोरोनाने नाकेनऊ आणले आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन हादरले असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. ऑक्सिजन बेड नाही, रेमडेसिव्हिर इंजेक्शन नाही अशी प्रतिकूल परिस्थिती आहे.

हेही वाचा: संतापजनक प्रकार! जात पंचायतने महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा..

अपयशी झुंज

निफाड तालुक्यातील अडीशे रुग्णांची झुंज अपयशी ठरली आहे. यात एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्तिंचाही समावेश आहे. वाढती रुग्णसंख्या व मुत्यूदर खळबळ उडवून देत आहे. रुग्णालये फुल झाली आहेत. त्यामुळे घरीच उपचार घ्यावा लागत आहे. अधिक संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांची अचानक प्रकृती खालावून मुत्यू ओढावत आहे. आतापर्यंत १४ हजार ७०० रुग्ण आढळले असून, त्यातील ४२४ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. मुत्यू दर २.८६ टक्के तर, रुग्ण बरा होण्याचा दर ७७.६१ टक्के एवढा आहे. त्यातील ११ हजार २६९ रुग्ण बरे झाले ही दिलासा दायक बाब आहे.

आरोग्य यंत्रणा ढेपाळली

एप्रिलमध्ये नव्याने साडेआठ हजार रुग्ण आढळले असून, हा आलेख अधिकच उंचावत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली. गावखेड्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल शहराकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे पिंपळगाव बसवंत, ओझर, निफाड, लासलगाव येथील कोविड सेंटर फुल झाली. पहिली लाट ओसरल्यानंतर प्रशासन गाफिल राहिले. कोणत्याही उपाययोजना झाल्या नाही. दुसर्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. दुसर्या लाटेशी तोंड देताना आरोग्य यंत्रणा ढेपाळली आहे.

हेही वाचा: वा रे पठ्ठ्या! पोलिस ठाण्यातच लगावली पोलिसाच्या कानशिलात; दोघांविरुद्ध गुन्हा

एप्रिलमध्ये रुग्ण व मृत्यूंची संख्या वाढली आहे. आरोग्य कर्मचारी झोकून देऊन नागरिकांचा कोरोनापासून बचावासाठी लढत आहेत. घरोघरी सर्वेक्षण सुरू असून लक्षण आढळलेल्या रुग्णांना उपचाराखाली आणले जात आहे.

- डॉ. चेतन काळे, नोडल अधिकारी, निफाड