esakal | फळांच्या निर्यातीतून देशाला २,६८९ कोटी! मागील वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांची घट 

बोलून बातमी शोधा

2689 crore to the country from fruit exports Nashik Marathi News

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फळांच्या निर्यातीतून देशाला दोन हजार ६८९ कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास तीन टक्क्यांची घट झाली आहे. 

फळांच्या निर्यातीतून देशाला २,६८९ कोटी! मागील वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांची घट 
sakal_logo
By
अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फळांच्या निर्यातीतून देशाला दोन हजार ६८९ कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास तीन टक्क्यांची घट झाली आहे. जागतिक बाजारपेठेचा विचार करता भारत हा फळे उत्पादन करणारा प्रमुख देश मानला जातो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक संकटांशी मुकाबला करून देशातून इतर देशांत फळे निर्यात केली आहे.

निर्यात धोरणामुळे फटका

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी निर्यात धोरणामुळे जवळपास तीन टक्के निर्यातीला फटका बसला आहे. भारताने एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत पाच लाख सात हजार टन फळांची निर्यात केली असून, यातून देशाला दोन हजार ६८९ कोटींचे परकीय चलन मिळाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत दोन हजार ७५१ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. त्या तुलनेत यंदा तीन टक्के घट दिसून आली. भारतातून प्रामुख्याने द्राक्ष, आंबा, केळी, डाळिंब, संत्री यांसारखी फळे मोठ्या प्रमाणात निर्यात केली जातात. भारतातील हवामान विविध प्रकारच्या फळ उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळे सर्व प्रकारच्या फळांबरोबर कृषिमालही देशात उत्पादित होतो. आपल्याकडील निर्यातक्षम उच्च प्रतीचा माल उत्पादित होऊनही परदेशातील बाजारपेठांमध्ये पाठविण्यासाठी अनेक दिव्य संकटातून जावे लागते. उत्पादन वाढीबरोबर उत्पादित मालाचे विपणन होणे, हा उत्पादकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनत चालला आहे. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

संपूर्ण जगाला भाजीपाला व फळे पुरविण्याची ताकत

स्थानिक बाजारातील मागणीपेक्षा पुरवठा वाढल्यास बाजारभाव एकदम मातीमोल होतात. गेल्या काही वर्षांत लहरी हवामानाचा फटका या क्षेत्राला बसला असून, यातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘बुडत्याचा पाय खोलात’ या पद्धतीने समस्या वाढतच आहे. दर्जेदार उत्पादन घेणारे शेतकरी आहे; पण तयार झालेला माल विकण्याची यंत्रणा बेभरवशाची असल्याने उत्पादकाला स्थानिक बाजारपेठेत मातीमोल भावाने हा माल विकावा लागतो. त्यामुळे त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले जाते. संपूर्ण जगाला भाजीपाला व फळे पुरविण्याची ताकत एकट्या भारत देशात आहे. सरकारने निर्यातीबाबतचे धोरण बदलले पाहिजे, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

निर्यातीतून मिळालेले चलन 

- नऊ महिन्यांत पाच लाख सात हजार टन निर्यात 
- निर्यातीतून दोन हजार ६८९ कोटी रुपयांचे परकीय चलन 
- मागील वर्षीचे परकीय चलन दोन हजार ७५१ कोटी 
- यंदा निर्यातीत तीन टक्के घट