esakal | आशादायक! मेरी कोविड केअर सेंटरमधून ८० टक्के बाधित कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

meri covid centre

आशादायक! मेरी कोविड केअर सेंटरमधून ८० टक्के बाधित कोरोनामुक्त

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : एकीकडे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडअभावी शहरात कोरोनाबाधित मृत्युमुखी पडत असल्याचे भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे मात्र मेरी कोविड केअर सेंटरमधून तब्बल ८० टक्के बाधित कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

बाधितांसाठी संजीवनी...

सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. नाशिक शहरात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. अशा परिस्थितीत पंचवटीतील मेरी येथील पंजाबराव देशमुख मराठा वसतिगृह येथे नाशिक महापालिकेने सुरू केलेले कोविड केअर सेंटर बाधितांसाठी संजीवनी ठरत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच येथे १ मार्चला १८० बेड असलेला विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. याठिकाणी सेंटरव्यतिरिक्त बाह्य रुग्णसेवा दिली जाते. आरटीपीसीआर (स्वॅब टेस्ट) व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केल्या जातात. येथील संपूर्ण स्टाफ विलगीकरण लक्षात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांना ठरलेल्या वेळेवर जेवण, गोळ्या, औषधे व वेळोवेळी जाऊन तपासणी करण्याचे काम करतात. सुखावह बाब अशी, की आजवर जवळपास ३९० रुग्णांवर उपचार केले असून, यातील ३२० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा: कोविड सेंटरमध्ये 'नो स्टंटबाजी'; एकाच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद

स्टाफ देताहेत तत्पर सेवा

मेरी कोविड केअर सेंटरमध्ये विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांच्या अधिपत्याखाली डॉ. संदीप पेखळे, प्रियंका नेर असे सर्व एकूण आठ डॉक्टर, तीन फार्मासिस्ट, चार लॅब टेक्निशियन, सहा नर्स सेवा बजावत आहेत. तसेच व्यवस्थापक म्हणून मंगेश चव्हाण व देवेंद्र धिवरे हे काम बघतात. मागील वर्षीदेखील हाच स्टाफ कोरोना रुग्णांना सेवा देत होता. विशेष म्हणजे, सेवा देत असतानाच यातील बहुतेक जण कोरोनाबाधित झाले. मात्र त्यावर मात करीत त्यांनी पुन्हा आपले कामकाज सुरू ठेवले आहे.

''लक्षणे दिसल्यास नागरिकांनी लगेच कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळेत उपचार होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होते. या कोरोना सेंटरमधील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी बाधितांची उत्तमप्रकारे काळजी घेतात. त्यांना वेळेत गोळ्या-औषधे दिली जातात. तसेच त्यांना सकस आहार आणि सकारात्मक विचार यांचेही महत्त्व पटवून दिले जाते. त्याचाही रुग्ण बरा होण्यास लाभ होतो.''

-डॉ. विजय देवकर, कोरोना नोडल अधिकारी, पंचवटी

हेही वाचा: लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकून कृषिमंत्री लगेच ऑन फिल्ड!

loading image