
Nashik Crime News : नाशिकरोडच्या बालाजी हॉस्पिटलवर कारवाई; अवैध गर्भलिंग चाचणी मशिन सापडले
नाशिक रोड : येथील श्री बालाजी हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी मशिन सापडल्यामुळे पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नाशिक महापालिका व पोलिस विभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बिटको हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र भंडारी यांचे हे हॉस्पिटल आहे. (Action on Balaji Hospital of Nashik Road Illegal pregnancy test machine found Nashik Crime News)
या हॉस्पिटलमध्ये तक्रारदाराच्या तक्रारीवरून येथे अवैध गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला मिळाली. येथे अचानक दिलेल्या भेटीमध्ये येथे गर्भलिंग निदान करणारे मशिन अवैधरीत्या आढळून आले. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कोणतेही मशिन हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याआधी किंवा बाळगण्यास आधी महापालिका वैद्यकीय विभागाची परवानगी घ्यावी लागते.
याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मशिनची सर्व कागदपत्रे आणि कायदेशीर परवाना लागतो. त्याशिवाय मशिन कार्यरत करता येत नाही. मात्र, तसे काहीही प्रक्रिया पूर्ण केलेली नसताना. हे मशिन अवैधरीत्या चालवत असल्याची माहिती वैद्यकीय विभागाला मिळाली. याअंतर्गत गर्भलिंग निदान होण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हे मशिन कोणाचे आहे, कुठून आले, मशिन कसे वापरले जायचे, आजपर्यंत किती गर्भलिंग निदान चाचण्या झाल्या असतील, याचा तपास सध्या महापालिका करीत आहे.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
या गंभीर गोष्टीची दखल घेऊन मनपाने कारवाई केली आहे. या वेळी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी पोलिस आणि वैद्यकीय पथकासह घटनास्थळी भेट देत ही कारवाई केली. दरम्यान, डॉ. भंडारी महापालिका वैद्यकीय विभागात वादग्रस्त ठरलेले आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. डॉ. भंडारी यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ करीत आहेत.
"आम्ही तक्रारदाराच्या तक्रारीवरून पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत मशिन सील केले आहे. मशिनचा पंचनामा झालेला असून, या संदर्भात आम्ही न्यायालयामध्ये सर्व पुरावे सादर करणार आहोत. पुढील कारवाई कोर्ट करेल." - डॉ. बापूसाहेब नागरगोजे. वैद्यकीय अधिकारी, मनपा