चंदनपुरीत दीड वर्षानंतर ‘जय मल्हार’चा गजर! भाविकांची दर्शनासाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jay Malhar - Chandanpuri

चंदनपुरीत दीड वर्षानंतर ‘जय मल्हार’चा गजर! दर्शनासाठी गर्दी

मालेगाव (जि. नाशिक) : बानुबाईच्या चंदनपुरीत दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर रविवारी (ता. २१) मल्हारभक्तांनी गर्दी केली होती. लग्नसोहळ्यांना सुरवात झाल्याने विवाह सोहळा असलेल्या कुटुंबियांकडून तळी भरणे, कोटम भरणे आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. कसमादेसह खानदेशमधील भाविक आले होते. दिवसभरात १० ते १५ हजारावर श्रद्धाळू खंडेरायाच्या चरणी नतमस्तक झाले.

धार्मिक कार्यक्रमांमुळे गोंधळींना दिलासा

कोरोनानंतर मंदिरे बंद असल्याने चंदनपुरीतील गजबज रोडावली होती. गाव व परिसराला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. मंदिर परिसरातील लहान-मोठ्या व्यावसायिक अडचणीत आले होते. चंदनपुरीत प्रत्येक रविवारी मल्हारभक्तांची मोठी गर्दी असते. लग्नसोहळे सुरु झाले आहेत. कसमादेसह खानदेशमधील बहुसंख्य कुटुंबिय लग्नसोहळ्याआधी देवाचा धार्मिक कार्यक्रम चंदनपुरीत करतात. तळी भरणे, कोटम भरणे, जागरण गोंधळ आदी कार्यक्रमांची आज रेलचेल होती. शेकडो कुटुंबिय खास वाहनातून आले होते. त्यामुळे वाहन तळ वाहनांनी भरले होते.

हेही वाचा: Nashik | अखेर डॉक्टर नववधूची होणारी अघोरी कौमार्य चाचणी टळली!

धार्मिक कार्यक्रमांमुळे शेकडो गोंधळींना दिलासा मिळाला. देवाच्या जागरण गोंधळाबरोबरच धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी कसमादेतील गोंधळी सकाळपासूनच चंदनपुरीत आले होते. पुरणपोळी बरोबरच ठिकठिकाणी सामीष जेवणावळींचा स्वाद दरवळत होता. श्रीफळ, फुलहार, भंडारा, शेव रेवडी आदींसह खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती. सकाळपासूनच येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने मंदिर परिसर गजबजून गेला होता. दुपारनंतर गर्दीत वाढ झाली. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी काही भाविकांचे मोबाईल व पैसे लांबविले.

''जय मल्हार ट्रस्टने भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेतून मल्हारभक्तांना सुरळीत दर्शन व्हावे, यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. किल्ला पोलिसांनी सहकार्य केले. भाविकांनी गर्दीत येताना मोबाईल, दागिने व पैसे सांभाळावेत. शक्यतोवर गर्दीत येतांना मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत.'' - सतीश पाटील, अध्यक्ष, जय मल्हार ट्रस्ट, चंदनपुरी

हेही वाचा: `ऐनवेळी‘ रासायनिक खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांची धावाधाव

loading image
go to top