Nashik : उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी हवाई सेवा हवीच

ozar airport
ozar airportesakal

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह जळगाव, धुळे, नगर व नंदुरबार ही शहरे येतात. उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक (Industrial), शेती (Agriculture), सहकारातील (Cooperation) प्रगती लक्षात घेता विमानतळावरून हवाई सेवा नसणे ही बाब दुर्दैवी आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतुकीच्या दृष्टीनेदेखील विमानसेवेला (air service) फायदा होवू शकतो. ही बाब अधोरेखित करणे महत्त्वाचे ठरते. (Air services are essential for development of North Maharashtra ozar airport nashik news)

उद्योग, बांधकाम तसेच हवाई क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे मत जाणून घेतले असता, उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी हवाई सेवा सुरू होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्या व्यतिरिक्त माल वाहतुकीलादेखील चांगली संधी मिळाल्यास आर्थिक प्रगती होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. नाशिकमधून द्राक्ष, कांदा हे नाशवंत पदार्थ देशाच्या बाजारपेठेत तत्काळ पोचविण्याची व्यवस्था होवू शकते. तसेच, नाशिकच्या फुलांना राजधानी दिल्ली व दुबईत मागणी असते. दिंडोरी परिसरातील फुले तत्काळ या बाजारपेठेत हवाई सेवेच्या माध्यमातून पोचविणे शक्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

"नाशिकला सक्षम विमान सेवा हवीच. ही सेवा केवळ नाशिकमधून बाहेर जाणाऱ्यांसाठीच नव्हे, तर बाहेरून नाशिकमध्ये विविध कारणांसाठी येणाऱ्यांसाठीही आवश्यक आहे. मुंबई हवाई सेवेचा ताण कमी करण्यासाठी नाशिकची उपयुक्तता मोठी आहे. नाशिकमधून दोनशे गाड्या मुंबई विमानतळावर प्रवासी घेऊन जातात. मुंबईतील ही गर्दी नाशिक विमानतळाच्या प्रभावी वापराने कमी करता येईल. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, मालेगाव आदी शहरांतील हवाई प्रवाशांचीही मोठी सोय होऊ शकेल. नाशिक आणि शिर्डी ही विमानतळे एकमेकांची स्पर्धक म्हणून नव्हे, तर परस्परपूरक म्हणून विकसित झाली पाहिजे. त्यासाठी ही दोन्ही विमानतळे एका विशेष कॉरिडॉरने जोडून त्याच्यातील अंतर कमी करणे सहज शक्य आहे. एकंदरीत नाशिकची हवाईसेवा चौफेर विकसित होणे ही काळाचीच मागणी आहे."
- हेमंत राठी, अध्यक्ष, नाशिक सिटीझन्स फोरम.

"कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी हवाई सेवा आवश्यक असते. हवाई सेवेमुळे क्षेत्रासाठी उत्पादन, आयटी, पर्यटन उद्योगांमध्ये अधिक नवीन गुंतवणूक मिळू शकते, ज्यामुळे अधिक रोजगार निर्माण होतील आणि नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेशाच्या समृद्धीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाईल. शेतकऱ्यांना त्यांचा नाशवंत माल विविध बाजारपेठांमध्ये पाठवण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळवून देण्यासाठीही याचा फायदा होईल. आयटी उद्योगांच्या उभारणीसाठी हवाई सेवा महत्त्वाची ठरते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. आयटी उद्योगात प्रवासी सेवा जेवढी जलद त्याप्रमाणात आयटी उद्योग स्थिरावले आहेत. त्यामुळे सरकारने नाशिकच्या भौगोलिक स्थानाचा विचार करून ओझर विमानतळावरून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरु करण्याची आवश्‍यकता आहे. या माध्यमातून नाशिकच नव्हे तर जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळेल."
- मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, नाशिक.

विकासात अव्वल येण्याची क्षमता असूनही सरकार दरबारी नाशिकची बाजू मांडणारे नेतृत्व नसल्याने विकासाचा ठराविक टप्पा गाठताना अडचणी निर्माण होत आहे. विमानसेवा नसल्याने आयटी कंपन्या येत नाहीत. सेवा सुरू झाल्यास आयटी, तसेच बांधकाम क्षेत्राला गती मिळेल. त्यातून अर्थकारण भरभराटीला येईल. एअर कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्यास शंभर टक्के फायदा होणार आहे. उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा आहे. नंदुरबार, जळगावमधील व्यक्तीला तातडीने मोठ्या शहरांमध्ये जायचे झाल्यास मुंबईला जावे लागते. ओझर विमानतळावरून हवाई सेवा उपलब्ध असल्यास फेरफटका टळेल. आर्किटेक्ट असोसिएशनकडून काही वर्षांपूर्वी विमानसेवेसाठी पाठपुरावादेखील केला होता. हवाई सेवा सुरू होणे महत्त्वाचे आहे. ती सेवा उडान योजनेंतर्गत असो की अन्य कुठल्याही योजनेतून हवाई सेवा मिळाली पाहिजे. एवढीच नाशिककरांची मागणी आहे.
- नीलेश चव्हाण, माजी अध्यक्ष, दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, नाशिक शाखा.

ozar airport
मालेगावला प्रभागरचनेवर सुनावणी; पूर्व भागातील हरकतीच जास्त

"लढाऊ विमाने तयार करण्याचा कारखाना, आर्टिलरी सेंटर, करन्सी नोट प्रेस, रेल्वे इंजिन तयार करण्याचा कारखाना, इंडिया सिक्युरिटी प्रेस, रेल्वेचे महत्त्वाचे केंद्र, मुंबई, पुणे या महत्त्वाच्या शहरापासून नजीकचे अंतर, औद्योगिक विकास या सर्व बाबींचा विचार करता यापूर्वीच विमानसेवा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, आजही निरंतर हवाई सेवेसाठी नाशिककरांना झगडावे लागते. हे दुर्दैव म्हणावे लागेल. नाशिकचा आतापर्यंतचा विकास येथील भौगोलिक स्थानामुळे झाला आहे. परंतु, वेगाने विकास करायचा असल्यास त्यासाठी हवाई सेवा गरजेची आहे. त्याचबरोबर सरकारची साथ हवी. उत्तर महाराष्ट्रासाठी विमानसेवा सुरू करताना नव्याने काही करण्याची आवश्‍यकता नाही. ओझर विमानतळ तयार आहे. या तयार इन्फ्रास्ट्रक्चरवर फक्त नियमित विमानसेवा सुरू होणे अपेक्षित आहे."
- विजय सानप, राष्ट्रीय अध्यक्ष, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर (इंडिया).

ozar airport
Nashik : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com