

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शालेय पाठोपाठ महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. केवळ अंतीम वर्षातील, अंतीम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहिर केले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत. यात अंतीम सत्रातील विद्यार्थ्यांना या सत्राची परीक्षा देण्यासोबत राहिलेल्या विषयांचीही परीक्षा द्यावी लागणार आहे.
केवळ अंतीम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाणार
पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा या दिशानिर्देशांनुसार घेतल्या जाणार आहेत. यापूर्वीच्या काळात एक्झाम फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेकरीता नव्याने फॉर्म भरावा लागणार नाही. अंतीम वर्षातील व अंतीम सत्रातील एक्झाम फॉर्म न भरलेल्या विद्यार्थ्यांना फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरावा लागेल. त्यासाठी मंगळवार (ता.19) पासून 28 मेपर्यंत मुदत असेल. या कालावधीत विलंब किंवा अती विलंब शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारले जाणार नाही. वार्षिक स्वरूपाच्या व सत्र पद्धतीच्या अभ्यासक्रमांसाठी बहुदा सर्व नियमावली सारखीच ठेवलेली आहे. वार्षिक अभ्यासक्रमांच्याही केवळ अंतीम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
इतर विद्यार्थ्यांचा असा ठरेल निकाल
नेहमीच्या परीक्षेपेक्षा यंदाच्या वर्षाची परीक्षा वेगळी असेल. अंतीम वर्ष वगळता अन्य विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार नाही. त्यामूळे अशा विद्यार्थ्यांचा निकाल लावतांना विद्यार्थ्यांच्या विषयाची ग्रेड ही 50 टक्के अंतर्गत मूल्यमापन व 50 टक्के मागील लगतच्या सत्रातील परीक्षेच्या गुणांवर आधारीत असेल. तसेच अंतीम वर्ष वगळता अन्य विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगची परीक्षा जुलै महिन्यात होणार नाही. पुढील नवीन सत्र सुरू झाल्यानंतर 120 दिवसांच्या आत या विद्यार्थ्यांची बॅकलॉगची परीक्षा घेतली जाईल.
पुढील वर्षात आश्वासित प्रवेश
अंतीम वर्षाचे विद्यार्थी वगळता अन्य सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात, सत्रात प्रवेश घेण्यासाठी पात्र समजले जाईल. ही तरतूद केवळ या शैक्षणिक वर्षापुरती असेल. मागील शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या (इयर ड्रॉप) विद्यार्थ्यांना या तरतुदीनुसार पुढील शैक्षणिक वर्ष किंवा सत्रात प्रवेश घेण्यास पात्र समजले जाईल. मात्र या सर्व विद्यार्थ्यांना गैरहजर असलेल्या किंवा अनुत्तीर्ण झालेल्या विषयांच्या परीक्षा जेव्हा घेतल्या जातील, त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.
अंतीम वर्ष, अंतीम सत्रातील विद्यार्थ्यांची अशी होईल परीक्षा
अंतीम सत्रात असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतीम सत्रातील विषयांची तसेच सर्व सत्रातील बॅकलॉग विषयांची लेखी परीक्षा पारंपारीक पद्धतीने घेण्यात येईल. विशेष बाब म्हणून सर्व विद्याशाखांतील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल 50 टक्के अंतर्गत गुण आणि 50 टक्के शेवटच्या सत्रात घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षांच्या एकत्रित मूल्यमापनावर आधारीत असतील. ही तरतूद केवळ सध्याच्या शैक्षणिक वर्षापुरता असेल. या विद्यार्थ्यांची नियमित व बॅकलॉग प्रात्यक्षिक, मौखिक परीक्षा, प्रोजेक्ट परीक्षा आदी व्यवहार्यता तपासून अंतर्गत मुल्यांकनाद्वारे अथवा व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेण्यात येईल.
असे असेल नियोजन
- दोन वर्षीय अभ्यासक्रमांमध्ये चौथ्या सत्राचे विद्यार्थी व चौथ्या सत्राच्या ज्या विद्यार्थ्यांना सत्र 1, 2 व 3 मधील बॅकलॉगचे विषय असतील, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील.
- तीन वर्षीय अभ्यासक्रमामध्ये सहाव्या सत्रातील विद्यार्थी व सहाव्या सत्राच्या ज्या विद्यार्थ्यांना सत्र 3, 4 व 5 मधील बॅकलॉगचे विषय असतील अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील.
- चार वर्षीय अभ्यसक्रमामध्ये आठव्या सत्राचे विद्यार्थी व आठव्या सत्राच्या ज्या विद्यार्थ्यांना सत्र 5, 6 व 7 मधील बॅकलॉगचे विषय असतील अशा विद्यार्थ्यांची परीक्षा होतील.
- पाच वर्षीय अभ्यासक्रमात दहाव्या सत्राचे विद्यार्थी व दहाव्या सत्राच्या ज्या विद्यार्थ्यांना सत्र 7, 8 व 9 मधील बॅकलॉगचे विषय असतील, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा होईल.
- दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांची फक्त अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 50 गुणांसाठी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.