
Success Story : सायकल दुरुस्ती करणाऱ्याच्या मुलाची 'गरूडझेप'
नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी दोन मुले, मुलगी, पत्नीसह खानदेशातून माळेगाव (सिन्नर) एमआयडीसीत (MIDC) आलेल्या दत्तू भाऊच्या घरात सहा महिन्यांअगोदरच दिवाळी साजरी होत आहे. त्यालाही तसे निमित्त आहे, सायकल दुरुस्ती करणारे दत्तूभाऊ व कंपनीत रोजंदारीवर जाणाऱ्या रत्नाताईंच्या राहुलने शिक्षण पूर्ण होण्याअगोदरच ३६ लाखांची वार्षिक पॅकेज असलेली नोकरी मिळविली आहे. (Annual package of Rs 36 lakh to Rickshaw drivers son Rahul Nashik Success Story News)
जळगाव (खानदेश) येथे मालवाहतूक रिक्षावर कुटुंबाचा रहाटगाडा चालविणारे दत्तू बडगुजर. म्हणावी तशी हातात रक्कम मिळत नसल्याने नाशिक शहर गाठले. त्यात माळेगाव (सिन्नर) एमआयडीसीतील कंपनीत रोजंदारीवर कामाला सुरवात केली. कुटुंबातील सदस्यांची संख्या पाच असल्याने दत्तूभाऊच्या आर्थिक ओढाताणीला पत्नी रत्नाताईंचे बळ मिळाले. रत्नाताई कंपनीत कामाला जाऊ लागल्या. मोठा मुलगा राहुल, लहानगा भावेश व मुलगी योगिता यांनी आई-वडिलांच्या प्रयत्नांना शिक्षणाच्या माध्यमातून साथ दिली. राहुलने माळेगावला सहावीपर्यंत शिक्षण घेतले. अभ्यासात गती असल्याने नवोदयला प्रवेश मिळाला. नवोदयमधून शिक्षण पूर्ण होत असताना अकरावी-बारावी कॉम्प्युटर विषय असल्याने त्याची गोडी लागली. लहानग्या भावेशने आई-वडिलांची शिक्षणासाठी होणारी कोंडी लक्षात घेत बारावीलाच शिक्षणाला राम राम ठोकत कामकाजाला सुरवात केली. जेसीबी चालवून मोठ्या भावाला मदत करू लागला.
हेही वाचा: नाशिक : डॉक्टरांना अखेर पर्यायी भूखंड उपलब्ध
आई-वडील व भावाच्या कष्टाचे चीज करीत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) पुणे येथे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (IT)च्या तिसऱ्या वर्षात शिकणारा राहुल बडगुजर याला ‘डाटा इनसाइट्स’ (Data Insights) या जागतिक नामांकित कंपनीने वार्षिक ३६ लाख पॅकेजची नोकरी दिली आहे. राहुलची डाटा इनसाइट्स कंपनीकडून ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ (Software Engineer) पदासाठी निवड झाल्याची माहिती पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे व पीसीईटी-नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली. पीसीईटी-नूतन ग्रुपच्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाबरोबरच रोजगारक्षम बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे श्री. लांडगे यांनी सांगितले.
हेही वाचा: नाशिक : माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही पाण्यासाठी वणवण
पीसीईटी-नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे दर वर्षी ३५० कंपन्यांची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. अंतिम वर्षातील २०२२ बॅचमधील पीसीईटी-नूतन ग्रुपच्या एक हजार ५८७ विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत एक हजार ५४३ जॉब ऑफर्स मिळाले आहेत, अशी माहिती सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली. सामाजिक बांधिलकीतून बेरोजगार युवकांना मदत करण्याच्या हेतूने पीसीईटी-नूतनच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे आतापर्यंत संपूर्ण भारतातील सुमारे १२ लाख बेरोजगार युवकांनी विविध ऑफ कॅम्पसमध्ये नोंदणी केली आहे. या प्रयत्नातून गेल्या काही वर्षांत सुमारे २५ हजार २२० बेरोजगारांना नोकरी दिल्याची माहिती प्रा. रवंदळे यांनी दिली.
ऑनलाइन इंटर्नशिपमधून ८० हजारांचे स्टायपेंड
राहुलशी संवाद साधला असता तो म्हणाला, की अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या ऑनलाइन प्रोग्रामिंगच्या स्पर्धांमध्ये मी नियमित भाग घेत होतो. तसेच अभ्यासक्रमातील विषयांव्यतिरिक्त इंटर्नशिप केल्यामुळे कंपनीतील लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. माझे प्रॅक्टिकल ज्ञान वृद्धिंगत झाले व त्याचा मला खूप फायदा झाला. शिकत असतानाच एका अमेरिकन कंपनीत गेले दीड वर्ष ऑनलाइन इंटर्नशिप केल्याचा मला प्रचंड फायदा झाला. प्रतिमहा ८० हजार रुपये स्टायपेंड मिळत असल्याचे राहुलने सांगितले. आपल्या भारताला संगणक क्षेत्रात खूप प्रगत बघण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी आमच्यासारख्या अभियंत्यांनी प्रयत्न केल्यास आपला देश नक्कीच ताकदवान बनेल.
"कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर आपण प्रतिकूल परिस्थितीमधूनदेखील मोठे यश मिळवू शकतो, हे राहुलने दाखवून दिले आहे, हाच आमच्यासाठी अभिमान आहे."
- दत्तू-रत्ना बडगुजर (राहुलचे वडील व आई)
Web Title: Annual Package Of Rs 36 Lakh To Rickshaw Drivers Son Rahul Nashik Success Story News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..