Latest Marathi News | पशुबळी टाळणे हाच संविधानाचा सन्मान; अंनिसचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Superstition Eradication Committee news

Animal Sacrifice : पशुबळी टाळणे हाच संविधानाचा सन्मान; अंनिसचे आवाहन

नाशिक रोड : नारदस्मृती व रुद्रयामल तंत्र आदी धर्मशास्त्राने पशुबळी ही प्रथा चुकीची असल्याचा दाखला दिला आहे. या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून पशुबळीला विरोध केला आहे. नाशिकचे महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी धर्मशास्त्रातील मंत्रांचा आधार घेऊन या प्रथेला विरोध दर्शविला आहे.

न्यायालयाचा निर्णयाचा सन्मान करून याबाबत अधिक तर्कसंगत विचार व्हायला हवा. संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा हक्क दिला आहे, मग पशूचा बळी का, असा प्रश्‍न उपस्थित करीत याविषयावर अधिक चर्चेची गरज व्यक्त करण्यात आली आहे. (Avoidance of animal sacrifice honor of Constitution Appeal of Superstition Eradication Committee Nashik Latest Marathi News)

तब्बल पाच वर्षांनी सप्तशृंगगडावर दसऱ्याच्या दिवशी बोकडबळी देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयात याबाबत दाखल जनहित याचिकेवर हा निर्णय दिला आहे. धोडांबे येथील आदिवासी विकास संस्थेने ही याचिका दाखल केली होती.

त्यावर गुरुवारी (ता. २९) झालेल्या सुनावणीत बोकडबळीला अटी-शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पुरोगामी आणि संविधानावर चाललेल्या आपल्या देशात असा प्रकार टाळायला हवा, असे बहुतेकांना वाटते, तर दुसरीकडे बोकडबळी देऊ नये असे धर्मशास्रातही सांगितले आहे.

नाशिकचे महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी बोकडबळीच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. महंत अनिकेतशास्त्री यांनी संपूर्ण भारतात व सर्व धर्मियांवर पशुबळी प्रथा बंद व्हावी यासाठी कायदा करावा, अशी मागणीदेखील केली आहे.

अनिसने या प्रथेला पहिल्यापासूनच विरोध केला आहे. समिती कर्मकांड, पशुबळी यांच्या विरोधात राहिली आहे. या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रथेला विरोध दर्शवीत कालबाह्य प्रथा पाळणे कितपत सुसंगत आहे याचा विचार व्हायला हवा, असे मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा: Dhule ZP News : अध्यक्ष निवडीत भाजपची कसरत; 3 तालुक्यांमध्ये रस्सीखेच

नारदस्मृती, रुद्रयामल काय सांगते?

यावज्जीवं तु यो मांस, विपत् परिवर्जयेत् वसिष्ठो भगवानाद, स्वर्गलोकं स गच्छति ॥ ११४ ॥
युप छित्वा पशून् हत्वा कृत्वा रुधिरकर्दमान । यद्यैवं गम्यते स्वर्ग, नरके केन गम्यते ॥ ११५ ॥
अकृत्वा प्राणिनां हिंसां मांसं नोत्पद्यते क्वचित् । न च प्राणिवधात् स्वर्गः तस्मान्मांसं विवर्जयेत् ॥

- नारदस्मृतीमध्ये भगवान नारदांनी विष्णू भगवंतांना प्रश्न विचारला आहे, की पशूंना नैवेद्य म्हणून बळी दिले तर देवता प्रसन्न होऊन बळी देणाऱ्याला जर का स्वर्गसुख देणार असेल तर मग नरकात कोण जाईल? हिंसा करून जर स्वर्ग प्राप्ती होणार असेल तर नरकात कोण जाईल?
‘रुद्रयामल तंत्रा’मध्ये शिवपार्वती संवादामध्ये शंकराने पार्वतीमातेला स्पष्ट निर्देश दिले आहेत, की तंत्र व अघोर विधीमध्ये नैवेद्य म्हणून मला जर काही अर्पण करायचे असल्यास ‘दद्योधन कुशमांड मास बलिम निवेदयामी’ अर्थात दत्तोधन म्हणजेच दही, कुष्मांड म्हणजे कोहळ, मास म्हणजे उडीद अर्पण कर. उडीद या धान्याला संस्कृतमध्ये मास म्हटले जाते.

संस्कृतच्या शब्दकोशाला अमरकोश म्हणतात. त्यामध्ये याचे विवरण स्पष्ट दिलेले आहे आणि महादेवाने पार्वतीला उपदेश दिला आहे, की मी या भुतलावरती परशुराम आहे. पशू याचाच अर्थ प्राण्यांचा मालक, प्राण्यांचा रक्षक त्यामुळे कोणत्याही देवता प्राण्यांचा बळी मागत नाही. या माध्यमातून पशुबळी देऊ नये, असे धर्मशास्त्र सांगते.

"आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करतो. तथापि 'वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वतःच्या जीवनात अंगीकार करावा' हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. धार्मिक क्षेत्रातील प्रथा, परंपरा, कर्मकांडे यांची वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कसोटीवर चिकित्सा केल्यानंतर जर यथार्थ वाटत असतील तर जरूर त्यांचे पालन करावे; परंतु जर त्या प्रथा कालबाह्य झाल्या असतील तर त्यांचे पालन करणे कितपत योग्य आहे? पशुबळीसारख्या कालबाह्य प्रथेचे आचरण हे एकविसाव्या शतकात नक्कीच कालसुसंगत नाही, असे वाटते." - प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अनिस

"भारत हा संविधानावरती चालतो, धर्मग्रंथाच्याही अगोदर आज आपला सर्वांचा आद्यग्रंथ हे संविधान आहे. संविधानाचा अर्थ समविधान ते संविधान म्हणजे भारत वर्षामध्ये जितके सजीव आहेत त्या सर्वांना समानतेचा अधिकार प्राप्त व्हावा. कोणावरही अत्याचार होऊ नये म्हणून केलेली सर्वोच्च व्यवस्था. जगण्याचा अधिकार मनुष्य प्राण्याचा आहे, तितकाच अधिकार सर्व प्राणिमात्रांनाही आहे. पशूंची हत्या होणे हा एक प्रकारे संविधानाची हत्या करण्यासारखे आहे."
- महंत अनिकेतशास्त्री देशपांडे, नाशिक

हेही वाचा: Nashik News : सासुरवासाला कंटाळून विवाहितेची मुलांसह आत्महत्या...; पतीला अटक