esakal | आम्ही कोरोनाचं वास्तव समजण्यासाठी राज्यभर फिरतोय : भाजप
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही कोरोनाचं वास्तव समजण्यासाठी राज्यभर फिरतोय : भाजप

महाराष्ट्रातील जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मात्र घरात बसून आहेत.

आम्ही कोरोनाचं वास्तव समजण्यासाठी राज्यभर फिरतोय : भाजप

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : भाजप नेते कोरोनाची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी राज्यभर फिरत आहेत. त्यामुळे ज्यांचे मुख्यमंत्री घरात बसून आहेत, त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील भाजपने काय केले, याबाबत माहिती घ्यावी, बालिशपणे बोलू नये, असा सल्ला भाजपतर्फे देण्यात आला.

हेही वाचा: आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी कोरोना रुग्णांच्या सेवेत

महापालिकेचे सभागृह नेते सतीश सोनवणे व भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी संयुक्त पत्रक काढून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावर टीका करणारे शिवसेना नेते अजय बोरस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यावर पलटवार केला. मुंबईला एफडीआय आयुक्तांना दीड तास घेराव घातल्यानंतरच नाशिकला दोन हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजन १०० टन उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. श्री. फडणवीस रुग्णसेवेची परिस्थिती जाणून घेऊन प्रशासनाला सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मात्र घरात बसून आहेत.

हेही वाचा: पोलिसांच्या मनमानीविरोधात व्यापाऱ्यांचा आजपासून बंद

शहरासाठी किमान निधी आणा

नाशिकला रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन भाजपच्या आंदोलनामुळेच मिळाला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीने बडबड करण्यापेक्षा राज्याकडून महापालिकेला कोविडसाठी व नाशिक शहरासाठी १०-२० कोटींचा निधी आणून दाखवावा. शहरातील नागरिकांची काळजी करू नये, त्यांची काळजी करण्यास आम्ही समर्थ आहोत.

जबाबदारी महापालिकेची नव्हे राज्य सरकारची

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रेमडेसिव्हिर व ऑक्सिजनचा तुटवडा नसून खासगी हॉस्पिटलमध्ये या दोन्ही गोष्टींचा तुटवडा आहे. रेमडेसिव्हिर व ऑक्सिजनचा या दोन्ही गोष्टी देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे, यामध्ये राज्य शासन सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे नाशिककर जनतेचा सर्व रोष हा राज्य सरकारवर असून केवळ दिशाभूल करण्यासाठी हे बालिश बोल दोन्ही पक्षांचे नेते बोलत आहेत, अशी टीका श्री. सोनवणे व श्री. पाटील यांनी केली.

loading image