esakal | प्रभाग सभापती निवडणूक : नाशिक रोडला भाजपमध्ये फूट; शहराध्यक्षांच्या भूमिकेवर संशय
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

नाशिक रोडला भाजपमध्ये फूट; सानप समर्थक आमदारांची दांडी

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरू असताना प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला जोरदार झटका बसला. पंचवटी विभागात माजी आमदार सानप यांचा मुलगा मच्छिंद्र सानप यांच्यासाठी दोन नगरसेवकांनी माघार घेतल्यानंतर नाशिक रोड विभागात मात्र सानप समर्थक सीमा ताजणे व विशाल संगमनेरे या दोन नगरसेवकांनी दांडी मारल्याने भाजपमध्ये फूट पडली व शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. (BJP-split-on-Nashik-Road-marathi-political-news-jpd93)

सानप समर्थक आमदारांची दांडी; व्हीप न बजावल्याने शहराध्यक्षांच्या भूमिकेवर संशय

विशेष म्हणजे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे व गटनेते अरुण पवार यांनी समसमान मते होणार असल्याने व्हीप बजावणे आवश्‍यक असल्याने ती प्रक्रिया पार न पडल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १९) ऑनलाइन निवडणुका पार पडल्या. पंचवटी, नाशिक रोड व पश्‍चिम विभागाच्या निवडणुकांकडे राजकीयदृष्ट्या अनेकांचे लक्ष होते. त्यानुसार नाशिक रोडमध्ये राजकीय भूकंप झाला. प्रथम पूर्व प्रभाग सभापतिपदासाठी निवडणूक झाली. बहुमत असल्याने भाजपच्या डॉ. दीपाली कुलकर्णी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली.

शिवसेनेचे बहुमत असलेल्या सिडको प्रभाग समितीत भाजपच्या छाया देवांग यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने शिवसेनेच्या सुवर्णा मटाले यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेला राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले यांची साथ मिळाली. पंचवटी प्रभाग समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी मुलगा मच्छिंद्र सानप यांच्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे नाराजांची संख्या वाढली. त्यातून रुची कुंभारकर व पूनम सोनवणे यांनी अर्ज दाखल केला. कुंभारकर व सोनवणे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने मच्छिंद्र यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

हेही वाचा: रिलायन्स, इंडियन ऑइलची नाशिकमध्ये दीड हजार कोटींची गुंतवणूक

शेवटपर्यंत दोघेही संपर्कात आले नाही

नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली. शिवसेना- राष्ट्रवादी, तसेच भाजपचे समान संख्याबळ असल्याने चिठ्ठी पद्धतीने सभापती निवड होणार होती. परंतु माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे कट्टर समर्थक सीमा ताजणे व

विशाल संगमनेरे यांनी दांडी मारल्याने शिवसेनेचे प्रशांत दिवे यांचा दोन मतांनी विजय झाला. पंचवटीत मच्छिंद्र सानप यांच्या उमेदवारीवरून नाराजी होती. पक्षाचे प्रभारी जयकुमार रावल यांनी मध्यस्ती करीत आमदार ॲड. राहुल ढिकले व स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी अन्य उमेदवारांना माघार घेण्यास सांगून सानप यांच्या निवडीचा मार्ग मोकळा केला. नाशिक रोड प्रभाग समितीमध्ये संख्याबळ समान असल्याने सानप यांची भूमिका महत्त्वाची होती. परंतु, आमदार ढिकले यांचा शह देण्याच्या उद्देशाने संगमनेरे व ताजणे यांना गैरहजर राहण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. त्यातून मीरा हांडगे यांचा पराभव होत शिवसेनेचे दिवे विजयी झाले. आमदार ढिकले यांनी संगमनेरे यांच्याशी संपर्क साधला; परंतु शेवटपर्यंत दोघेही संपर्कात आले नाही.

हेही वाचा: अथांग सागराशी मीही करणार दोन हात.. कोकणगावच्या साहिलची जिद्द

पश्‍चिममध्ये माघारीची नामुष्की

पश्चिम प्रभाग समितीमध्ये काँग्रेसच्या वत्सला खैरे यांच्यासमोर आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे यांचा अर्ज होता. या प्रभागात मनसेने भाजपला पाठिंबा देण्याच्या अटीवर सातपूरमध्ये मनसेला भाजप पाठिंबा देईल, असे ठरले होते. परंतु, मनसेच्या ॲड. वैशाली भोसले यांनी पाठिंबा देण्यास नकार दिल्याने हिरे यांना अर्ज मागे घ्यावा लागला. त्यामुळे खैरे यांची बिनविरोध निवड झाली. सातपूर प्रभागात, मात्र भाजपने मनसेला दिलेला शब्द पाळला. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतल्याने योगेश शेवरे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली.

प्रदेशाध्यक्षांची पाठ फिरताच बंडखोरी उफाळली

शहराध्यक्ष गिरीश पालवे व गटनेते अरुण पवार यांची नगरसेवकांना व्हीप बजावणे गरजेचे होते; परंतु तो बजावला न गेल्याने दोघांच्याही भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पाठ फिरताच पक्षातील बंडखोरी उफाळून आल्याने पक्षात राम राहिला नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: चित्रपटांना ओटीटी पर्याय, नाटकांना काय?, नाट्यकर्मींचा सवाल

loading image