औषध खरेदीवरून भाजप विरुद्ध शिवसेना, NCP आमनेसामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

औषध खरेदीवरून भाजप विरुद्ध शिवसेना, NCP आमनेसामने

नाशिक : कोरोनासाठी आवश्‍यक असलेल्या ११ कोटी ५२ लाख रुपयांच्या ३५ प्रकारच्या औषध खरेदीच्या निविदाप्रक्रियेला मान्यता देण्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ होत सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी वाद पुन्हा एकदा दिसून आला आहे. ज्या विषयावरून एवढा गोंधळ झाला, त्या औषध खरेदीला मान्यता देण्याचे राहून गेले. उर्वरित विषयांसाठी पंधरा दिवसांनी पुन्हा सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय झाला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. ७) अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली रावसाहेब थोरात सभागृहात झाली. सर्वसाधारण सभेच्या सुरवातीला आयते व ऐनवेळी आलेल्या एकूण ८३ विषयांपैकी औषध खरेदी निविदा मान्यतेचा विषय वगळता इतर ८२ विषय सदस्यांच्या संमतीने मंजूर झाले. यानंतर सभेच्या दुसऱ्या सत्रात औषध खरेदीचा विषय घेण्यात आला. या वेळी भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी औषध खरेदी करणाऱ्यापूर्वी औषधांचे दर ठरविण्यासाठी कशाचा आधार घेण्यात आला. शासनाने ठरवून दिलेल्या हाफकिनकडून किती औषधांची खरेदी झाली? संस्थांकडून खरेदीसाठी पत्र दिले का? हाफकिन या संस्थेच्या दरापेक्षा तुमचे आधारभूत दर अधिक कसे काय आले? आरोग्य विभागाने नेमून दिलेल्या इतर खासगी संस्थांकडून खरेदीसाठी तुम्ही विचारणा केली का? आधारभूत दर हे अंदाजे लावलेले होते, तर त्यापेक्षा कमी दर आल्यानंतर ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्रांमध्ये आधार किंमत ठरवून देऊन ॲन्टिजेन किट खरेदी करण्याचे आदेश का दिले, असे औषध खरेदीबाबतचे अनेक प्रश्‍न विचारून जिल्हा आरोग्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत जाब विचारला.

हेही वाचा: नाशिक, जळगावात नीडल फ्री लसीकरण | Corona

मात्र कुंभार्डे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना आरोग्य अधिकारी यांनी हाफकिनकडे औषध खरेदीची ऑर्डर दिल्याचे सांगत ते सर्व औषधे पुरविणार नसल्याचे सभागृहास सांगितले. यावर कुंभार्डे यांचे समाधान झाल्याने हाफकिनकडून आलेले चार कोटी रुपये परत कसे आले, यासह अनेक प्रश्‍न उपस्थित करत प्रशासनास धारेवर धरले. यावर आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांनीदेखील या प्रकरणात आपल्याला जादा माहिती नसल्याचे सांगितले. अखेर श्रीमती बनसोड यांनी प्रशासकीय बाजू मांडत तेव्हाची परिस्थिती वेगळी असल्याचे सांगत औषध खरेदी समितीने एकत्रित येत पारदर्शक पद्धतीने औषध खरेदी दर ठरविले आहेत. ते चुकीचे नसल्याचे सांगत यात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही, असे सभागृहास सांगितले.

सभागृहात गोंधळ

औषध खरेदीच्या मुद्द्यावर डॉ. कुंभार्डे यांना भाजप सदस्या मनीषा पवार यांनी साथ देत प्रश्‍नांचा भडिमार केला. यानंतर राष्ट्रवादीचे महेंद्रकुमार काले, सुरेश कमानकर आदी सदस्यांनी या विषयावर समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी केली. यावर डॉ. कुंभार्डे यांनी नकार दिल्यानंतर शिवसेनेचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी या प्रश्‍नावरून डॉ. कुंभार्डे यांच्याशी वाद घालत केवळ विरोधाला विरोध म्हणून औषध खरेदीबाबत भाजपची भूमिका चुकीची असल्याचे म्हटले. त्यानंतर नयना गावित आणि मनीषा पवार यांच्यातदेखील चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तुमच्यावर विरोध करण्यासाठी राजकीय दबाव आहे व तुम्ही मला बोलू देणार नाही, याची जाणीव असल्याने आम्ही सभागृह सोडतो, पण या खरेदीला मान्यता देण्याआधी माझा विरोध नोंदवा, जिल्हा परिषद मात्र कोण चालवत आहे हे यातून सिद्ध होत असल्याचेही कुंभार्डे यांनी सांगितले. यानंतर माजी सभापती यतिंद्र पगार यांनी या सर्व प्रकरणात मध्यस्थी करत सर्वांना शांत करत यावर योग्य तोडगा काढण्याचे प्रशासनास सांगितले. औषध खरेदीच्या माध्यमातून मात्र भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा वाद दिसून आलेला आहे.

हेही वाचा: UPSCच्या भू-वैज्ञानिक परिक्षेत नाशिकच्या अथर्व पवारचे यश

या वेळी सभापती संजय बनकर, सुरेखा दराडे, अश्‍विनी आहेर, सुशीला मेंगाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे सोबतच सभागृहात झालेल्या इतर चर्चेत रूपांजली माळेकर, नूतन आहेर, कविता धाकराव, उदय जाधव, रमेश बोरसे, सिद्धार्थ वनारसे, यशवंत शिरसाठ आदी सदस्यांनीदेखील सहभाग नोंदविला. या वेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Bjp Vs Shiv Sena Ncp Clash Over Medicine Purchase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpNashikShiv SenaNCP
go to top