Nashik News : मेंदूमृत रुग्‍णाने दिले 9 रुग्णांना नवजीवन! आठवडाभरापूर्वीच भरला होता अवयवदानाचा अर्ज... | Brain dead patient gave new life to 9 patients by organ donation nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Organ Donation

Nashik News : मेंदूमृत रुग्‍णाने दिले 9 रुग्णांना नवजीवन! आठवडाभरापूर्वीच भरला होता अवयवदानाचा अर्ज...

Nashik News : येथील नाशिक- मुंबई महामार्गावर इगतपुरीजवळ सोमवारी (ता.२२) दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाला. या भीषण अपघातात धुळे येथील ३१ वर्षीय मनीष सनेर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.

या अपघातात ते मेंदूमृत घोषित झाले. (Brain dead patient gave new life to 9 patients by organ donation nashik news)

आठवडाभरापूर्वीच त्‍यांनी अवयवदानाचा अर्ज भरलेला असल्‍याने, भावुक झालेल्‍या त्‍याच्‍या आई- वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेत गरजू रुग्‍णांना जीवनदान दिले आहे. अपघातात जखमी मनीष सनेर यांना प्रारंभी नाशिक शहरातील एका खासगी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत नाजूक होती.

मनीष कोमात असून मेंदूमृत अवस्‍थेकडे त्‍यांची वैद्यकीय स्‍थिती जात असल्‍याचे रुग्‍णालयातील डॉक्‍टरांच्‍या निदर्शनात आले. यानंतर त्‍यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्‍यानंतर व वैद्यकीय अहवाल बघून अपोलो हॉस्पिटलमधील 'ब्रेन डेथ कमिटी'तील डॉक्टरांनी त्‍यांना मेंदूमृत घोषित केले.

अपघाताच्या चार-पाच दिवस आधीच मनीष यांनी अवयवदानाचा फॉर्म भरलेला होता. नुकतेच त्‍यांचे डोनर कार्ड कुरिअरने घरी आलेले होते. त्यामुळे भावुक झालेल्‍या मनीषच्या आईवडिलांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अवयवदानासाठी मनीषच्या नातेवाइकांची सहमती असल्याने अवयवदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाच्‍या झेडटीसीसी या अवयवदान समितीला कळविले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करताना अपोलो हॉस्पिटलमध्ये लगेचच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली.

अपोलो हॉस्पिटलचे मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्‍ज्ञ डॉ. मोहन पटेल म्हणाले, की अवयवदानाची सर्वाधिक गरज भारतात आहे. नाशिकमध्ये अवयवदानाचे प्रमाण अत्‍यल्‍प आहे. वयाच्या ३१ व्या वर्षी मनीषची अवयवदानाची इच्छा होती. अपघातानंतर तो मेंदू मृत अवस्थेत होता. त्याच्या पालकांनी, नातेवाइकांनी अवयवदानाची सहमती दिली.

या घटनेतून सामाजिक संदेश मिळणार आहे. अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा म्हणाले, की आरोग्य संचनालयाकडून अपोलो हॉस्पिटल येथे ब्रेन डेथ कमिटी नियुक्त केली आहे. यामुळे हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया सुलभपणे पार पडली. अवयवदान केल्याने नऊ रुग्णांना नवीन जीवन मिळते.

सुयश हॉस्पिटलमधील अस्थिविकार तज्‍ज्ञ डॉ.प्रशांत पाटील, डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी अपोलो हॉस्पिटलला संपर्क केला. अवयवदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत हॉस्पिटलमधील आयसीयू विभागाचे डॉ. अतुल सांगळे, डॉ. अमोल खोळमकर, डॉ. प्रवीण ताजणे, मेंदुविकार तज्‍ज्ञ डॉ.जितेंद्र शुक्ल, फिजिशियन डॉ.शीतल गुप्ता,

डॉ. राजश्री धोंगडे, भुलतज्‍ज्ञ डॉ. चेतन भंडारे, शल्यचिकित्‍सक डॉ. मिलिंद शहा, मूत्रविकार व शस्त्रक्रिया तज्‍ज्ञ डॉ. प्रवीण गोवर्धने, डॉ. किशोर वाणी, हृदय शस्त्रक्रिया तज्‍ज्ञ डॉ. अभयसिंग वालिया, मेंदू व मणके शस्त्रक्रिया तज्‍ज्ञ डॉ. संजय वेखंडे, अवयव प्रत्यारोपण समन्वयक चारुशीला जाधव यांनी परिश्रम घेतले.