नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या गोंधळाचा उमेदवारांमध्ये संताप | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या गोंधळाचा उमेदवारांमध्ये संताप

नाशिक : अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) मुलाखत प्रक्रिया आटोपून त्‍याच दिवशी गुणवत्ता यादी जाहीर करत सुखद धक्‍का दिला होता. निकाल प्रक्रिया गतिमान करताना आयोगाच्‍या या बदलांचे उमेदवारांकडून स्‍वागत करण्यात आले. परंतु नुकताच आयोगाने संयुक्‍त पूर्व परीक्षा 2021 च्‍या सुधारीत उत्तरतालिकेतील 8 प्रश्‍न रद्द केल्‍याने उमेदवारांचा संताप अनावर झालेला आहे. प्रश्‍न रद्द करण्याचा हा सिलसिला नित्‍याचा झाला असून, आता न्‍यायालयात धाव घेऊनच दाद मागावी लागेल, अशी भावना उमेदवारांकडून व्‍यक्‍त होते आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्‍या संयुक्‍त पूर्व परीक्षा 2021 या परीक्षेची पहिली उत्तरतालिका (Answer sheet) गेल्‍या 26 फेब्रुवारीला प्रसिद्ध केली होती. यानंतर उमेदवारांकडून हरकती मागविण्याची प्रक्रिया मागविली. प्राप्त हरकतींनंतर सुधारीत उत्तरतालिका 5 मे ला जाहीर केली. मात्र या उत्तरतालिकेत 8 प्रश्‍न रद्द केल्‍याचे निदर्शनास आले आहे. तसेच तीन प्रश्‍न बदलून दिल्‍याचाही प्रकार समोर आला आहे. यापूर्वी 2020 मध्येदेखील प्रश्‍न बदलल्याचा प्रकार घडला आहे. प्रश्‍न रद्द करणे हा प्रक्रियेचा भाग असून, यात उमेदवारांचे नुकसान होत नसल्‍याचा आयोगाचा दावा आहे.

यासंदर्भात किरण हा परीक्षार्थी म्‍हणाला, की जेव्‍हा पहिल्‍या उत्तरतालिकेच्‍या आधारे गुणांचा अंदाज घेतला, तेव्‍हा 53 गुण होत होते. परंतु सुधारीत उत्तरतालिकेतील 8 प्रश्‍नांनंतर साधारणतः दहा गुण कमी होणार असल्‍याने अनिश्‍चितता वाढलेली आहे. गेल्‍या वर्षी 2020 मध्येही प्रश्‍न रद्दच्‍या प्रकारामुळे उमेदवारांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले होते. यावर ठोस तोडगा निघत नसल्‍याने न्‍यायालयात जाण्याखेरीज पर्याय दिसत नाही आहे.

"साधारणतः एमपीएससीच्‍या परीक्षेत पहिल्‍या उत्तरतालिकेत पन्नासच्‍या आसपास असलेले अनेक जण अंतिम उत्तरतालिकेनंतर 35 टक्क्यांवर येऊन पोहोचत असल्‍याने मुख्य परीक्षेत निवडीसंदर्भात संभ्रम असतो. आयोगाची परीक्षा अभ्यासाचा खेळ कमी, नशिबाचा खेळ जास्‍त बनू पाहतोय, हे धक्‍कादायक आहे."
-संदीप, परीक्षार्थी

हेही वाचा: MPSC : ‘संयुक्त गट-ब परीक्षा २०२०’ परीक्षेअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

"परीक्षेमध्ये प्रत्‍येक सेकंद महत्त्वाचा असतो. चुकीच्‍या प्रश्‍नांमुळे वेळ वाया जातो. सर्व प्रश्‍न बरोबर असणे हा उमेदवाराचा हक्‍क आहे. आठ प्रश्‍न रद्द होणे ही तज्‍ज्ञांची चूक असली तरी आयोगाची जबाबदारी आहे."

-योगेश, परीक्षार्थी

हेही वाचा: MPSC पूर्व परीक्षेतील रचनेत केला महत्‍वपूर्ण बदल

Web Title: Candidates Angry Due To Confusion Of Maharashtra Public Service Commission Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top