MPSC पूर्व परीक्षेतील रचनेत केला महत्‍वपूर्ण बदल | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

MPSC पूर्व परीक्षेतील रचनेत केला महत्‍वपूर्ण बदल

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या (MPSC) राज्‍यसेवा पूर्व परीक्षेतील रचनेत महत्‍वपूर्ण बदल केला आहे. त्‍यानुसार आता सिसॅटचा पेपर हा आर्हता प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या पेपरमध्ये ३३ टक्‍के गुण प्राप्त उमेदवारांचे पेपर क्रमांक एकमधील गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या निर्णयामुळे कला, वाणिज्‍य शाखेतील उमेदवारांचे मुख्य परीक्षा देण्याचे प्रमाण वाढेल, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

अशी असेल रचना...

यापूर्वीच्‍या संरचनेनुसार पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन अशी एकूण चारशे गुणांच्‍या कामगिरीच्‍या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्रता ग्राह्य धरली जात होती. पेपर क्रमांक एक सामान्‍य अध्ययन याकरीता प्रत्‍येकी दोन गुणांसाठी शंभर प्रश्‍न विचारले जायचे. तर पेपर क्रमांक दोनमध्ये नागरी सेवा अभियोग्‍यता चाचणी (CSAT) यावर आधारीत परीक्षेत प्रत्‍येकी अडीच गुणांसाह ऐंशी प्रश्‍न सोडवावे लागायचे. दोन्‍ही पेपरची कामगिरी महत्‍वाची असल्‍याने बहुतांश वेळा विज्ञान शाखा किंवा तंत्रशिक्षण घेतलेल्‍या उमेदवारांचे पारडे जड राहायचे. व कला व वाणिज्‍य शाखेतील विद्यार्थी पेपर क्रमांक दोनमुळे काही प्रमाणात मागे राहात होते. अशा परीस्‍थितीत युपीएससीच्‍या धर्तीवर सिसॅटचा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) काल (ता.२) परिपत्रक जारी करुन महत्‍वाचा बदल करत असल्‍याचे जाहीर केले आहे.

असा असेल बदल..
आता राज्‍यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक दोन तपासल्‍यानंतर, ज्‍या उमेदवारांना किमान ३३ टक्‍के गुण अर्थात ६६ किंवा त्‍यापेक्षा अधिक गुण प्राप्त असतील अशा उमेदवारांचा पेपर क्रमांक एक तपासला जाईल. पेपर क्रमांक एकच्‍या गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

"सिसॅटचा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार असल्‍याने कला, वाणिज्‍य शाखेतील विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. आत्तापर्यंत सिसॅटच्‍या गुणांमुळे विज्ञान शाखा, तंत्रशिक्षण असलेल्‍या उमेदवारांचे पारडे जड राहात होते. आता सर्वांना समान संधी उपलब्‍ध होऊ शकतील."
-राम खैरनार, संस्‍थापक, युनिव्‍हर्सल फाउंडेशन