Latest Marathi News | Golf Clubला Carच्या काचा फोडून ऐवज चोरीला; मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Golf club was stolen instead of a car window being broken

Nashik Crime News : Golf Clubला Carच्या काचा फोडून ऐवज चोरीला; मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल

नाशिक : गोल्फ क्लब मैदानाबाहेर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोरट्यांनी महागडे मोबाईल, रोकड, जॅकेट चोरून नेल्याचा प्रकार रविवारी (ता. २०) सकाळी घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर याउलट सरकारवाडा पोलिसात तक्रार देताना तक्रारदारांना विचित्र अनुभव आला असून, कारची काच फोडून लाखाचा मोबाईल चोरीला गेला असताना सरकारवाडा पोलिसांनी फिर्याद घेण्याऐवजी मोबाईल गहाळचा छापील अर्ज तक्रारदाराकडून लिहून घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे सरकारवाडा पोलिसात वेगळे कायदे आहेत का, असा सवाल संतप्त तक्रारदाराने उपस्थित केला आहे.

त्र्यंबकरोडवरील गोल्फ क्लब येथे जॉगिंग तर, जलतरण तलाव येथे स्विमिंगसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. पहाटेपासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत नागरिक येथे येतात आणि त्यांची वाहने गोल्फ क्लब परिसर, टिळकरोड, त्र्यंबकरोडवर पार्क करतात. दरम्यान, रविवारी (ता. २०) सकाळी या परिसरात पार्क करण्यात आलेल्या आठ ते दहा चारचाकी वाहनांच्या चोरट्यांनी काचा फोडल्या आणि कारमधील किमती ऐवज चोरून नेला आहे. (Car window smashed at Golf Club Cash Money stolen Case is filed Mumbai Naka Police Strange situation in Sarkarwada police Nashik News)

हेही वाचा: Nashik Educational Update : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक

श्‍वेता समीर भिडे यांनी शासकीय विश्रामगृहालगत असलेल्या गोल्फ क्लब मैदानाच्या रस्त्यावर त्यांची होंडा झेंड चारचाकी कार (एमएच १५ एचक्यु ९७२१) पार्क केली होती. या कारची काच अज्ञात चोरट्यांनी फोडून कारमधील सॅमसंगचा मोबाईल, जॅकेट आणि लेदरची बॅग चोरून नेली. याचप्रमाणे, राजेंद्र खरात यांच्याही चारचाकी कारची (एमएच ०६ एडी ७७०१) काच फोडून चोरट्यांनी कारमधील ५ हजारांची रोकड, जॅकेट चोरून नेले. तसेच, स्वप्निल सुधाकर येवले यांच्याही चारचाकी कारची (एमएच १५ बीएक्स ४७७६) काच फोडून १० हजार रुपयांची रोकड व जॅकेट तर, प्रवीण कुमार यांच्या कारची (एमएच १५ बीएक्स ५२९९) काच फोडली आणि कारमधून साडेतीन हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार रविवारी (ता. २०) पहाटे साडेपाच ते नऊ वाजेच्या दरम्यान घडला आहे.

सरकारवाडा पोलिसांकडून अजब प्रकार

उद्योजक महेंद्र छोरिया यांनी त्यांची कार (एमएच १५ जीएक्स ६५००) जलतरण सिग्नलकडील टिळकरोडवर पार्क केली होती. कार लॉक करून ते पहाटे साडेपाचच्या दरम्यान गेले. साडेआठ-नऊच्या सुमारास परत आले असता, त्यांच्या कारच्या चालकाशेजारील दरवाजाची काच फोडून चोरट्यांनी लॉकरमधून एक लाखांचा महागडा आयफोन-१२ चोरून नेला. याप्रकरणी त्यांनी तात्काळ सरकारवाडा पोलिस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला असता, ठाणे अंमलदार असलेल्या श्रीमती पवार यांनी चोरीची फिर्याद घेण्याऐवजी त्यांच्याकडील मोबाईल गहाळ झाल्याचा छापील अर्ज छोरिया यांच्याकडून भरून घेतला. त्यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत विचारले असता, श्रीमती पवार यांनी नकार देत त्यांना जाण्यास सांगितले. यामुळे एकाच स्वरुपाचा प्रकार घडलेला असताना मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल होतो तर सरकारवाडा पोलिसात दाखल होत नाही याचा अजब अनुभव तक्रारदारास आला.

हेही वाचा: Subhash Lamba Statement : खासगीकरणाच्या नावाने देशाच्या संपत्तींची विक्री