
Nashik Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या OBC सतर्कतेबद्दल BJPच्या प्रमाणपत्राची नाही गरज : छगन भुजबळ
Nashik Chhagan Bhujbal : निवडणुका आल्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसींविषयी जागा झालेला नाही, असा टोला लगावत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज (ता.५) येथे राष्ट्रवादीच्या ओबीसीविषयक सतर्कतेबद्दल भारतीय जनता पक्षाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याची टीका केली. (Chhagan Bhujbal statement about No need for BJP certificate on NCP OBC alert nashik news)
तसेच ओबीसी विद्यार्थी वसतिगृह प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केलेल्या योजनेची कार्यवाही नाही, याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
नागपूरमधील ओबीसी अधिवेशनाहून परत आल्यावर श्री. भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिनाचा कार्यक्रम नगरमध्ये होत आहे. राज्यात कार्यक्रम व्हावेत. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात ही त्यामागील भूमिका आहे. मात्र तुम्ही काय करता हा खरा प्रश्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या आरक्षणासाठी, भिडेवाडा प्रश्नी, विद्यार्थी वसतिगृहासाठी लढा दिला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अर्वाच्य भाषा वापरली म्हणून आम्ही लढतोय. सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा महाराष्ट्र सदनातून हलवला म्हणून आम्ही संघर्ष केला. त्यावेळी तुम्ही गप्प बसलात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात
प्रत्येक पक्षाला वाटते, आपला मुख्यमंत्री व्हावा. त्यादृष्टीने विरोधीपक्षनेते अजित पवार हे बोलले. त्यांचे बोलणे वास्तवात आणण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक जागांवर आमदार निवडून आणावे लागतील.
तसेच श्री. पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात, असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून श्री. पवार हे मुख्यमंत्री होणार नसतील, तर तुम्ही करणार काय? असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
छगन भुजबळ म्हणालेत...
० काँग्रेसचे नेते दिल्लीला जातात. तसे भाजपचे नेते दिल्लीत असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत जातात
० आमचे नेते शरद पवार हे पुणे, मुंबई, दिल्लीत आणि तेही सहज भेटतात
० शिवसेनेतून फुटलेल्यांवर आम्ही टीका केली, तर चालेल. पण भाजपच्या नेत्यांनी (दिनकर पाटील यांचा उल्लेख न करता) ‘गद्दार' म्हणू नये. ते मुख्यमंत्र्यांनाही लागू पडते
० राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मुंबईत कमी आहे. हे आम्ही मान्य करतो. मात्र सगळ्यांनी निवडणूक लढवल्यास पायात पाय अडकवल्यासारखे होईल
० नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आमचा अभ्यास सुरु आहे. अभ्यास करून त्याबद्दल आम्ही ठरवू
० विरोधीपक्षनेते अजित पवार कानाखाली म्हणालेत म्हणजे, कानात ओरडून सांगेन असा त्याचा अर्थ आहे
० खासदार संजय राऊत आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यातील प्रश्न आता मिटला आहे
० लव्ह जिहाद बद्दल मी भाष्य करणार नाही. कुणी त्रास देत असल्यास पोलिसांनी कारवाई करावी