esakal | प्लाझ्मा बँकेच्या संकल्पनेचा आग्रह आलाय पुढे! दात्यांची यादी देणार जिल्हाधिकाऱ्यांना  
sakal

बोलून बातमी शोधा

plazma therepy.jpg

"कोरोनामुक्तीनंतर पॉझिटिव्ह ॲन्टीबॉडीज तयार झाल्यात. त्यामुळे प्लाझ्मा उपलब्ध करून देऊ इच्छितो, अशा दात्यांची यादी तयार केली जाणार आहे. ही यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाणार आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आवश्‍यक असलेल्या प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला या यादीचा उपयोग होईल."

प्लाझ्मा बँकेच्या संकल्पनेचा आग्रह आलाय पुढे! दात्यांची यादी देणार जिल्हाधिकाऱ्यांना  

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोनाग्रस्त रुग्णांना प्लाझ्मा योग्य वेळी दिल्यास त्याचा चांगला फायदा होत असल्याचे आढळून आल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्याचवेळी प्लाझ्मा बँकेची संकल्पना पुढे आली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांचे प्लाझ्मा संकलनाची चळवळ उभारून त्यातून उपलब्ध होणारे प्लाझ्मा संकलित करायचे आणि ते गरजूंना द्यायचे. याचा अवलंब करणे शक्य असल्याने कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोनावरील उपचारात गृहविलगीकरणाची संकल्पना राबणारे नाशिकमधील डॉ. अतुल वडगावकर यांनी कोरोनामुक्तीनंतर प्लाझ्मा दानासाठी तयार असलेल्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे ठरवले आहे. 

रुग्णांच्या निरीक्षणाच्या नोंदी ठेवणे सोपे
मुंबईतील मीनाताई ठाकरे रक्तपेढीला प्लाझ्मासाठीची मंजुरी मिळाली होती. मात्र रक्तपेढीतर्फे त्यावेळच्या परिस्थितीतील काही प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यासंबंधाने वैद्यकीय शिक्षण संचालनालयासह अन्न-औषध प्रशासनाचे अधिकारी प्रश्‍नांच्या अनुषंगाने चर्चा करायचे. मात्र त्याबद्दल लेखी कुणीही दिले नसल्याने प्लाझ्मा प्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्याची माहिती रक्तपेढीतर्फे रमेश इसावलकर यांनी दिली. एवढेच नव्हे, तर प्लाझ्मासाठी लागणाऱ्या किटची किंमत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोळा हजारांवरून अकरा हजार रुपये अशी जाहीर केल्यावर अनेक कंपन्या गायब झाल्याचे अनुभवास मिळाल्याची माहिती श्री. इसावलकर यांनी दिली. रक्तपेढीला भेडसावलेल्या प्रश्‍नांची स्थिती एकीकडे अशी असताना दुसरीकडे कोरोनाच्या यापूर्वीच्या लाटेत सरकार, प्रशासनाच्या जोडीला अनेक संस्था, व्यक्ती, डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने काम केले. नाशिकमधील गंगापूर रोडवर डॉ. वडगावकर यांनी कोरोना क्लिनिक चालवले. खुल्या जागेवर कोरोनाचा कमी होणारा फैलाव लक्षात घेऊन त्यांनी खुल्या क्लिनिकमध्ये उपचार सुरू केले. प्रत्येक रुग्णाला गृहविलगीकरण संपेपर्यंत पल्स ऑक्सिमीटर मोफत उपलब्ध करून दिले. त्याद्वारे रुग्णांच्या निरीक्षणाच्या नोंदी ठेवणे सोपे झाले. डॉ. वडगावकर यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हा पॅटर्न ग्रामीण भागात राबविण्याबाबत शिफारस करण्यात येईल, असे दिवाळीच्या अगोदर अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले होते. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता


एका प्लाझ्मासाठी आठ ते साडेआठ हजार रुपये 
कोरोनाग्रस्तांवरील इलाजासाठी किती प्लाझ्मा वापरायचे, याचा निर्णय डॉक्टर घेतात. तसेच एका प्लाझ्मासाठी रुग्णांच्या कुटुंबीयांना आठ ते साडेआठ हजार रुपये द्यावे लागतात. हा खर्च कसा येतो? याची माहिती घेण्यात आली. त्या वेळी प्लाझ्मा किटचे अकरा हजार रुपये लागतात. म्हणजेच, एका प्लाझ्मासाठी साडेपाच हजार रुपये खर्च घेतला जातो. शिवाय कावीळ, एचआयव्ही अशा तपासण्यांसाठीचे बाराशे रुपये आणि अँटीबॉडीजचे प्रमाण किती आहे, हे तपासणीसाठीचे सर्वसाधारणपणे आठशे रुपये याचा एका प्लाझ्माच्या खर्चात समावेश असल्याचे रक्तपेढींतर्फे सांगण्यात आले. अँटीबॉडीज स्कोर ०.५ पेक्षा अधिक आहे काय? हे तपासण्यासाठी दोन पद्धतीच्या चाचण्या केल्या जातात. या पद्धतीत एकावेळी आठ नमुन्यांच्या चाचण्या होत असल्या, तरीही किमान पाच नमुने आवश्‍यक असतात. सद्यःस्थितीत प्लाझ्मा दात्यांची संख्या फार मोठी नसल्याने एका नमुन्याचीसुद्धा चाचणी करावी लागते. त्याचा खर्च दोन हजार रुपयांच्या आसपास जातो. प्रत्यक्षात रुग्णांना आठशे रुपये आकारले जातात. दुसऱ्या केमी चाचणीत एका नमुन्याची तपासणी करता येते. त्यासाठी नऊशे रुपये खर्च येतो. प्लाझ्मा पुरेशा आहेत काय? आणि किती आहेत? अशा दोन प्रकारच्या चाचण्या होतात. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

कोरोनामुक्तीनंतर पॉझिटिव्ह ॲन्टीबॉडीज तयार झाल्यात. त्यामुळे प्लाझ्मा उपलब्ध करून देऊ इच्छितो, अशा दात्यांची यादी तयार केली जाणार आहे. ही यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाणार आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आवश्‍यक असलेल्या प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला या यादीचा उपयोग होईल. - डॉ. अतुल वडगावकर, नाशिक