कोरोनामुळे लांबला नाशिक मेट्रोचा प्रवास!

nashik metro
nashik metroesakal

नाशिक : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘मेट्रो निओ’ (metro neo) प्रकल्पासाठी केंद्राने तरतूद केल्यानंतर आता कॅबिनेटच्या बैठकीत देखील मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाची आवश्‍यक असलेली मंजुरी मिळविण्यासाठी प्रकल्पाची नस्ती पंतप्रधान कार्यालयात पोचली आहे. अंतिम मोहोर उमटल्यानंतर दोन महिन्यांत निविदा काढून एजन्सी नियुक्ती केली जाणार आहे. दरम्यान, कोविडमुळे मेट्रो निओचा प्रवास लांबला असला तरी मुदतीत प्रकल्प पूर्णत्वास येईल, असा विश्‍वास सूत्रांनी व्यक्त केला. (delay-in-Nashik-Metro-due-to-corona-marathi-news)

प्रकल्पासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१८ ला नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शहरात मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको आणि महामेट्रोकडून करण्यात आले. नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ताशी २० हजार प्रवासी क्षमता उपलब्ध नसल्याने एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस महामेट्रोने केली होती. त्यानुसार टायरबेस मेट्रो सेवेसाठी दिल्ली येथील राइट्स कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. टायरबेस मेट्रो सुरू करण्याचे पहिले पाऊल म्हणून विधानसभेत सादरीकरण करून ऑगस्ट २०१९ मध्ये ‘मेट्रो निओ’ असे प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मेट्रो निओ प्रकल्पासाठी दोन हजार ९२ कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली. प्रकल्पासाठी २१००.६ कोटी खर्च येणार असून, राज्य सरकार, सिडको व महापालिकेचा वाटा २५५ कोटींचा असणार आहे. केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये, तर एक हजार १६१ कोटी कर्ज स्वरूपात उभारले जाणार आहेत. प्रकल्पासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे.

२०२३ पर्यंत पूर्णत्वाची मुदत

देशभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजविल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आला. परिणामी सर्वच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर त्याचा परिणाम झाला. मेट्रो निओ प्रकल्पाला त्याचा फटका बसला. कोरोनाचा अडथळा आला नसता तर आतापर्यंत एजन्सी नियुक्त होऊन प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली असती, मात्र अर्थसंकल्प मंजुरी, कॅबिनेटची मंजुरी व आता पंतप्रधान कार्यालयाकडे प्रकल्पाची नस्ती पडून आहे. २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वाची मुदत आहे.

असा आहे मेट्रोचा मार्ग

मेट्रो निओसाठी ३१ किलोमीटर लांबीचे दोन एलिव्हेडेट मार्ग प्रस्तावित असून, या मार्गांवर २५ मीटर लांबीची २५० प्रवासी क्षमतेची जोडबस धावणार आहे. पहिला एलिव्हेटेड कॉरिडॉर दहा किलोमीटर लांबीचा असून, त्यात गंगापूर, जलालपूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी दहा स्थानके आहेत. दुसरा कॉरिडॉर गंगापूर ते नाशिक रोड असा २२ किलोमीटर लांबीचा असून, त्यात गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर, नाशिक रोड अशी स्थानके असतील. सीबीएस कॉमन स्टेशन राहील, तर मेट्रो मार्गावर एकूण २९ स्टेशन राहणार आहेत. याशिवाय दोन फीडर कॉरिडॉर असतील. त्यांपैकी एक सातपूर कॉलनी, गरवारे, मुंबई नाकादरम्यान चालेल, तर दुसरा नाशिक रोड, नांदूर नाका, शिवाजीनगरदरम्यान चालेल.

nashik metro
खरेच विकासकामे की ‘इलेक्शन डिप्लोमसी’?
nashik metro
रस्त्यावर वाढदिवस करणे भोवले; सटाण्यात ५ युवकांविरोधात गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com