
अजंगची सासुरवाशीण मुंबईत लोको पायलट!
वडेल (जि.नाशिक) : लेकींच्या पंखांना बळ दिले, की त्या प्रगतीच्या शिखरावर उंच भरारी घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध करतात. याचा प्रत्यय अजंग (ता. मालेगाव) येथील सासुरवाशीण असलेल्या धनश्री महेंद्र जाधव (सुतार) या सावित्रीच्या लेकीकडे पाहिल्यावर येतो.(Dhanashree-jadhav-Loco-pilot-in-Mumbai-nashik-marathi-news)
पहिल्या रेल्वेचालक सुरेखा भोसले-यादव यांचा ठेवला आदर्श
धनश्री ही अजंग या छोट्याशा खेडेगावातील प्रा. महेंद्र जाधव यांची पत्नी. ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथे शालेय शिक्षण झालेल्या धनश्रीने नगाव (जि. धुळे) येथील गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शाखेतील इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विषयांमध्ये २०११ मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर २०१२ ते २०१४ या दोन वर्षांच्या कालावधीत तिने रिलायन्स नेटवर्किंगमध्ये नेटवर्क इंजिनिअर म्हणून काम केले. २०१४ मध्ये अजंग येथील प्रा. महेंद्र जाधव यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्याच वर्षी मुंबईतील लोको पायलट पदासाठी तिने आवेदनपत्र सादर केले. २०१४ मध्ये तांत्रिक परीक्षा दिल्यानंतर ती त्यात उत्तीर्ण होऊन २०१६ मध्ये तिने मानसिक क्षमता चाचणीतही यश मिळविले. २०१७ मध्ये वैद्यकीय क्षमता चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर तिची ‘लोको पायलट’ म्हणून प्रशिक्षणासाठी निवड झाली. वडोदरा व उदयपूर येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या बांद्रा प्रभागात तिची सहाय्यक लोको पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यकपदासाठीही तिची नियुक्ती करण्यात आली. एकाच वेळी कर सहाय्यक व सहाय्यक लोको पायलट म्हणून नियुक्तीच्या दोन संधी हातात असताना आशिया खंडातील पहिल्या रेल्वेचालक साताऱ्याच्या सुरेखा भोसले-यादव यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून महिलांसाठी दुर्मिळ असणाऱ्या वेगळ्या क्षेत्रातील संधी निवडण्याचा निर्णय धनश्रीने घेतला व ती लोको पायलट म्हणून रुजू झाली.
आव्हाने स्वीकारून वाटचाल
दोन वर्षांच्या पश्चिम रेल्वे प्रभागातील योगदानानंतर ती आता मध्य रेल्वेच्या कल्याण मुंबई मंडलामध्ये वरिष्ठ लोको पायलट म्हणून कार्य करीत आहे. धनश्रीचे पती महेंद्र वाशिंद (जि. ठाणे) येथे इतिहासाचे प्राध्यापक असून, मोठी बहीण मुंबई महापालिकेत कार्यरत आहे. भाऊ लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत आहे. वडील अशोक सुतार मुंबई महापालिकेतून उपअधीक्षकपदावरून निवृत्त झाले आहेत. लोकलचे स्टीअरिंग आपल्या हातात घेऊन ग्रामीण भागातील मुलींना योग्य शिक्षण व योग्य संधी मिळाली, तर त्या कोणत्याही क्षेत्रातील आव्हाने पेलण्यास समर्थ असतात, असाच सकारात्मक संदेश धनश्रीने सर्वांना दिलेला आहे.
वेगळे क्षेत्र निवडून वेगळेपण सिद्ध करण्याच्या धनश्रीच्या महत्त्वाकांक्षेला आम्ही सासरच्या मंडळींनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. लोको पायलट म्हणून तिचे वेगळेपण तिने अधोरेखित केले याचा आम्हा जाधव कुटुंबीयांना नेहमी अभिमान आहे. -प्रा. महेंद्र जाधव, धनश्रीचे पती
धनश्रीला लहानपणापासून धाडसी निर्णय घेण्याची आवड आहे. तिने निवडलेल्या लोको पायलट या क्षेत्रात महिलांचा वावर फार कमी आहे. तिच्या वेगळेपणाचा आम्हा माहेरच्या मंडळीला नेहमी अभिमान वाटतो. -अशोक सुतार, धनश्रीचे वडील