नाशिक : सावाना अध्यक्षपदी ग्रंथालय भूषणचे दिलीप फडके तर पॅनलची निर्वीवाद सत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savana nashik President election

नाशिक : सावाना अध्यक्षपदी ग्रंथालय भूषणचे दिलीप फडके तर पॅनलची सत्ता

नाशिक : नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय (सावाना) कार्यकारी मंडळासाठी झालेल्या निवडणूकीची आज (ता. 09) सकाळपासून मतमोजणी सुरु होती. यात ग्रंथालय भूषणचे दिलीप फडके यांचा विजय झाला आहे. (Dilip Phadke Savana nashik President election)

अवघ्या ७३ मतांनी फडके यांचा विजय झाला आहे. यावेळी ग्रंथालय भूषणच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अध्यक्षपदासाठी पहिल्या फेरीअखेर 3 हजार 45 मतांची मोजणी झाली होती. यात 20 मते बाद झाली होती.

ग्रंथालय भूषणचे दिलीप फडके यांना 1977 तर ग्रंथमित्र पॅनेलचे वसंत खैरनार यांना 1904 मिळाली.

हेही वाचा: ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात कमालीची वाढ

मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर ग्रंथमित्र पॅनेलचे उमेदवार वसंत खैरनार यांना 1 हजार 575 मते तर ग्रंथालय भूषण पॅनेलचे उमेदवार दिलीप फडके यांना 1 हजार 450 मते मिळाली होती.

मात्र पहिल्या फेरीअखेर तब्बल १२५ मतांची आघाडी घेलेल्या वसंत खैरनार यांना दुसऱ्या फेरीत फटका बसला. तर ग्रंथालय भूषणच्या दिलीप फडके यांनी मुसंडी मारत विजयाला गवसणी घातली.

हेही वाचा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या गोंधळाचा उमेदवारांमध्ये संताप

सावानाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष- उपाध्यक्षपदांपाठोपाठ कार्यकारी मंडळ सदस्यपदाच्या मतमोजणीतही ग्रंथालय भूषण पॅनलनेच बाजी मारली असून, एकूण १५ पैकी तब्बल १२ जागांवर विजय मिळवला आहे. तर प्रतिस्पर्धी ग्रंथमित्र पॅनलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. जोरदार लढत देऊनही अपक्ष उमेदवारांना मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही. दरम्यान, उमेदवारांची वाढलेली संख्या आणि मतमोजणीसाठी ऐनवेळी नियुक्त करण्यात आलेले नवखे कर्मचारी या मुळे मंगळवारी (ता. १०) रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. त्यामुळे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि समर्थकांनाही ताटकळत बसावे लागले.
या निवडणुकीत ग्रंथालय भूषण पॅनलने सुरवातीपासूनच प्रचार, गाठीभेटी आणि प्रत्यक्ष मतदानापर्यंतही जोरदार प्रयत्न केले. त्याचे एकत्रित फळ म्हणून अध्यक्षपदी प्रा. दिलीप फडके, तर उपाध्यक्षपदी वैद्य विक्रांत जाधव आणि प्रा. सुनील कुटे विजयी झाले. मंगळवारी सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. सकाळी साडेदहाला मतमोजणीस सुरवात करण्यात येऊनदेखील पहिल्या फेरीची आकडेवारी थेट दुपारी ३ वाजनू ५० मिनिटांनी जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या फेरीची आकडेवारी साधारण साडेसहानंतर आणि तिसऱ्या फेरीची आकडेवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जाहीर झाली. तर रात्री ११.१० च्या सुमारास अंतिम आकडेवारीसह निकाल जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होताच ग्रंथालय भूषण पॅनलचे विजयी उमेदवार व समर्थकांनी वाचनालय परिसरात जल्लोष केला.

सुरवातीपासून आघाडी

कार्यकारी मंडळ सदस्यपदासाठीही मोठी चुरस बघावयास मिळाली. मात्र, ग्रंथालय भूषण पॅनलच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्याचे दिसून आले. दुसऱ्या फेरीनंतरही याच पॅनलच्या आणखी दोन उमेदवारांनी मुसंडी मारत निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट केले होते. तिसऱ्या फेरीअखेर निकालाचे संपूर्ण चित्रच दृष्टिपथात आले. त्यानंतर चौथ्या फेरीअखेर ग्रंथालय भूषण पॅनलचे १२ आणि ग्रंथमित्र पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. एस. जी. सोनवणे यांनी जाहीर केले.

विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते)

ग्रंथालय भूषण पॅनल :
संजय करंजकर (१९८६), प्रेरणा बेळे (१९४६), जयेश (गणेश) बर्वे (१८६३), जयप्रकाश जातेगावकर (१८२६), ॲड. अभिजित बगदे (१७९०), सुरेश गायधनी (१७२१), देवदत्त जोशी (१७२१), डॉ. धर्माजी बोडके (१६६४), गिरीश नातू (१६२३), सोमनाथ मुठाळ (१५९४), मंगेश मालपाठक (१५६७), उदयकुमार मुंगी (१५४६).
ग्रंथमित्र पॅनल : प्रशांत जुन्नरे (१५६१), श्रीकांत बेणी (१५१५) आणि भानुदास शौचे (१५०३).

हेही वाचा: विभागीय अधिकाऱ्यांचे वाढले अधिकार; महापालिका आयुक्‍तांकडून आदेश जारी

मतमोजणीतील गमतीजमती

सोमवारी अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची मतमोजणी सुरू असताना मतपत्रिकेसोबत ‘मन की बात’ या शीर्षकाखाली एक चार पानी निनावी पत्र मिळाले होते. त्यानंतर मंगळवारीही तीन मतपत्रिका पूर्णतः कोऱ्या, तीन पत्रिकांवर अंगठ्याचे ठसे, तर दोन मतपत्रिकांवर एका उमेदवाराचे नाव लिहून त्यापुढे ‘आय लव्ह यू’ असे लिहिलेले आढळून आले, तर काही मतपत्रिकांवर फक्त चौदा मत नोंदवलेले अशा विविध गमतीजमती बघावयास मिळाल्या. अर्थात‌च यासर्व मतपत्रिका बाद करण्यात आल्या आहेत. एकूण मतमोजणीत जवळपास नऊ टक्के मतपत्रिका बाद ठरल्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

माधवराव भणगेंची आठवण

सार्वजनिक वाचनालयाच्या यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये माधवराव भणगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यांच्या कामकाजाची पद्धत आणि अंगवळणी पडलेली निवडणूक यामुळे कितीही किचकट प्रक्रिया असली तरी मतमोजणीसाठी कधीच खोळंबा होत नसे. अशा आठवणी सांगतानाच, आज मात्र विलंब आणि खोळंबा होत असल्याने फक्त कार्यकारी मंडळ सदस्यांची मतमोजणी असूनही एवढा उशीर होत असल्याचा त्रागाही अनेकांनी व्यक्त केला.

Web Title: Dilip Phadke Savana Nashik President Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikelection
go to top