Nashik Water Scarcity: पाणीटंचाईची धग दिवसागणिक वाढणार; देवळा तालुक्यात कालव्याच्या पाण्यावरून तू तू,मै मै

Chankapur Right Canal
Chankapur Right Canalesakal

Nashik Water Scarcity : कसमादे भागातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नद्या व कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी वाढणार आहे. चणकापूर उजव्या वाढीव कालव्याला पाणी सोडावे यासाठी तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेने बैठका घेत तसेच शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देत जनरेटा वाढवला.

इतर भागातही पाणीपुरवठा व शेतीसाठी आत्तापासूनच पाण्याची मागणी होऊ लागली आहे. नद्या, धरणे, तलाव कोरडे पडल्याने पाण्यासाठी ‘तू तू मै मै’ होऊ लागल्याने पाण्यावरून नजीकच्या काळात मतभेदाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा ठरणार हे नक्की!. दुसरीकडे प्रशासनाने यातून मार्ग काढत वेळीच नियोजन, उपाययोजना करण्याची गरज आहे. (Dispute over canal water in Deola taluka nashik news)

कसमादेचा पूर्व भाग जलसिंचनाच्या दृष्टीने तसा तहानलेलाच. गिरणा, आरम, मोसम नद्यांसह काही कालव्यांमुळे काही भागाची तहान भागत असली तरी इतर भाग तहानलेलाच आहे. यावर्षी कसमादे भागात पुरेसा पाऊस न झाल्याने येथील छोटी-मोठी धरणे, नद्या, तलाव कोरडेच आहेत. परिणामी वर उल्लेख केलेल्या नद्या व कालवे यातून जे पाणी मिळेल तेवढीच आशा उरली आहे.

यामुळे आगामी काळात सगळ्यांना पिण्यासाठी असो की शेतीसाठी पाणी पुरवणे अवघड जाणार आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने या पाणीप्रश्नाबाबत उमेदवारांना व नेत्यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. कसमादेतील चणकापूर, पुनंद, हरणबारी, केळझर या धरणातून पाण्याचा प्रामुख्याने पुरवठा होतो. परंतु या धरणांतील पाणीसाठा मर्यादित असल्याने संपूर्ण कसमादेला पाणीपुरवठा करण्यास मर्यादा पडतात.

यामुळे पाण्यावरून गावागावांत वाद होण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी या भागाला पाणीपुरवठ्याचा नवीन सक्षम पर्याय उपलब्ध झाला पाहिजे. सुरगाणामधील पावसाचे वाहून जाणारे पाणी वळण बंधाऱ्याद्वारे अडवून ते गिरणा खोऱ्यात वळविण्याची गरज आहे. आपले हक्काचे पाणी मिळवण्यासाठी व कसमादेसह नांदगाव, सुरगाणा व इतर परिसराला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी वांजुळपाणी संघर्ष समिती गेल्या सात-आठ वर्षांपासून शासनदरबारी व जनतेत

आवाज उठवत आहे. नार -पार गिरणा नदीजोड प्रकल्पास राज्यशासनाच्या ८ हजार कोटीच्या निधीतून मान्यता देण्याचे सूतोवाच मागेच झाले होते, त्याबाबतच्या कामाकडेही जनता आस लावून बसली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे, अन्यथा पुढील काळात पाण्यावरून बिकट प्रसंग उद्भविण्याची शक्यता वाढली आहे.

Chankapur Right Canal
Nashik News : महिनाभर आधीच गुंजताहेत पक्ष्यांचे मधुर तराणे; परदेशी पाहुण्यांचा निफाडला मुक्काम

कसमादेतील प्रमुख कालवे -

कळवण ः चणकापूर उजवा कालवा, सुळे डावा, सुळे उजवा

देवळा ः चणकापूर उजवा व वाढीव कालवा, गिरणा उजवा कालवा

सटाणा ः हरणबारी उजवा व डावा कालवा, गिरणा डावा कालवा, केळझर डावा कालवा, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा.

मालेगाव ः मोसमसाळ कालवा, १८ बंधाऱ्यांचे कालवे.

कालव्यांची क्षमता घटली

कसमादेतील कालवे पाणी वाहून नेत असले तरी यातील काही कालव्यांची वहनक्षमता अत्यंत कमी आहे, ती वाढवणे गरजेचे आहे. चणकापूर उजवा कालव्याची मंजूर वहनक्षमता १७३ क्यूसेस आहे, परंतु प्रत्यक्षात ती तेवढी नसल्याने ९० ते ११० इतकेच क्यूसेस पाणी सोडले जाते. त्यातही गळती आणि चोरी अडवणे हे एक कठीण काम त्यामुळे रामेश्वर धरणापर्यंत ते ४० ते ६० क्यूसेस इतकेच जेमतेम पाणी पोहोचते.

या कालव्याची वहनक्षमता ३०० क्यूसेस केल्यास पावसाळ्यातील पूरपाण्याचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना होईल. यावर्षी पन्नास हजारपेक्षा जास्त क्यूसेस पूरपाणी गिरणा धरणात वाहून गेले. कालवे मोठे असते तर हे सर्व पाणी वळविता आले असते. गिरणा उजव्या कालव्याची वहनक्षमता सुरुवातीला २६६ क्यूसेस आहे, मात्र तेही शेवटी कमीच पोहोचते.

"देवळा तालुक्याचा पूर्व भाग कायमच दुष्काळग्रस्त राहिला आहे. चणकापूर उजवा कालवा हा या भागासाठी वरदान ठरणारा असला तरी तो सर्वच गावासाठी पुरेसा ठरत नाही. यामुळे नाहकच पाण्यासाठी गावागावात वाद निर्माण होत असतात. त्यासाठी या कालव्याची वहनक्षमता वाढविण्याची गरज आहे. जेणेकरून पूरपाण्याच्या मदतीने धरणे-तलाव भरत येथील नालेओहोळ वाहू लागतील."- प्रकाश आहेर, खुंटेवाडी, ता. देवळा.

Chankapur Right Canal
Group School Scheme : समूह शाळा योजनेला राज्यातून नकारघंटा; शिक्षण तज्ज्ञांसह शिक्षक संघटनांचाही वाढता विरोध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com