
Nashik: स्थळ पाहणीच्या नावाखाली कामांना टप्पे; रजिस्टरबरोबरच ॲपमध्येदेखील नोंदीच्या सूचना
नाशिक : स्थळ पाहणीच्या नावाखाली कामांना टप्पे देणाऱ्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी चांगलेच फैलावर घेतले असून, स्थळ पाहणीसाठी जाताना हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करण्याबरोबरच आता महापालिकेच्या पोर्टल किंवा ॲपमध्येदेखील नोंदी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. (do register site inspection details on nmc portal or app orders to officers given by NMC commissioner Nashik news )
२०१६ पासून महापालिकेच्या मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच महापालिकेच्या विविध उपकार्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. कार्यालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी व कार्यालयीन कामकाज बंद होत असताना असे दोनदा बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक आहे. मात्र, बायोमेट्रिक हजेरीतून अधिकारी तसेच अभियंत्यांना सूट देण्यात आली आहे.
ही सूट देताना हालचाल नोंदवहीमध्ये हाताने नोंद करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेत अनेक अधिकारी स्थळ पाहणीच्या नावाखाली गायब असतात. नगरसेवक असो किंवा आयुक्तांना अधिकाऱ्यांशी काम पडल्यास विचारणा होते. त्या वेळी साइट व्हिजिटला गेल्याचे उत्तर मिळते. बहुतेकदा बांधकाम व नगररचनाच्या अधिकाऱ्यांसंदर्भात तक्रारी असतात. आयुक्तांकडून ज्या वेळी अधिकाऱ्यांना विचारणा होते, त्या वेळी साइटवर गेल्याचे उत्तर देऊन टाळाटाळ केली जाते.
हेही वाचा: Nashik Crime : 2 ठिकाणी दरोडा; मारहाण, रोकडसह 3 लाख 38 हजारांचा मुद्देमाल लांबविला
त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सदर बाब गांभीर्याने घेत हालचाल नोंदवहीमध्ये नोंद करण्याबरोबरच आयुक्तांना स्थळ पाहणीची माहिती आयुक्तांना देणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या पोर्टल किंवा ॲपमध्ये हालचाल नोंदवहीप्रमाणे सुविधा निर्माण करण्याच्या सूचना माहिती व तंत्रज्ञान विभागाला दिल्या. या माध्यमातून स्थळ पाहणीच्या नावाखाली वैयक्तिक व्यवसाय, खासगी कार्यालयातून काम करणाऱ्या किंवा घरी आराम करणाऱ्या अधिकाऱ्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
आयुक्तांची कठोर भूमिका
मागील आठवड्यात नाशिक रोड विभागीय कार्यालयामध्ये स्वच्छता विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर महापालिका मुख्यालयात लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅप लावल्याची चर्चा होती. सदर प्रकार आयुक्तांच्या कानावर गेल्याने शिस्त लावण्यासाठी तातडीची बैठक संध्याकाळच्या सुमारास बोलविली. या बैठकीला सर्व विभाग प्रमुखांसह अभियंत्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु काही महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहिल्याने आयुक्तांनी कठोर भूमिका घेत त्यांना विचारल्याशिवाय स्थळ पाहणीला न जाण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा: Diwali Festival: यंदा आतषबाजीला महागाईची झळ!; फटाक्यांच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ