esakal | ऑक्सिजन गळती, प्रशासकीय व्यवस्थेचे बळी अन् डॉ. झाकीर हुसैन हॉस्पीटल......

बोलून बातमी शोधा

zakir hussain hospital
ऑक्सिजन गळती, प्रशासकीय व्यवस्थेचे बळी अन् डॉ. झाकीर हुसैन हॉस्पीटल......
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : आपत्तीजनक घटना घडल्यानंतर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महापालिका, शासन स्तरावर यंत्रणा असतानाही डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात घटना घडली, प्रशासकीय व्यवस्थेच्या त्रुटींमुळेच दुर्घटना घडून त्यात नाहक गोरगरीब २२ जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या वेळी आपत्ती व्यवस्थापनाचे काम एक टक्कादेखील दिसून न आल्याने आपत्ती व्यवस्थापन फक्त कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचा कारभार समोर

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा ऑक्सिजन कमी झाल्याने नाहक २२ जणांचा बळी गेल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचा कारभार समोर आला आहे. घटनेच्या निमित्ताने काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत. ते असे, ज्या वेळी ऑक्सिजन गळती झाली, त्या वेळी रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नव्हती, नगरसेवकांकडून पोर्टेबल ऑक्सिजन अर्थात, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जात आहे. त्या माध्यमातून तात्पुरता का होईना ऑक्सिजनचा पुरवठा होऊन रुग्णांचा जीव वाचला असता. शहरात भविष्यात उत्तुंग इमारती होणार म्हणून आठ ते दहा कोटी रुपयांची शिडी खरेदी करण्यात आली आहे. मात्र, ऑक्सिजन प्लांट नादुरुस्त झाल्यानंतर रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने खर्चाच्या विषयांकडे प्रशासनाचे लक्ष असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. घरामध्ये एक सिलिंडर संपल्यानतर तातडीची गरज म्हणून दुसरे सिलिंडर असते किंवा किमान स्टोव्ह, इलेक्ट्रिक शेगडी असते. हा साधा उपाय घरामध्ये होत असेल, तर जेथे रुग्णांच्या जिवाचा प्रश्‍न आहे तेथे ऑक्सिजनची तात्पुरती व्यवस्था का केली गेली नाही, असा प्रश्‍न निर्माण होत असल्याने महापालिका आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी जबाबदार असून, नाशिक शहरात आपत्ती व्यवस्थापन फोल ठरल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

अर्धा तासात आटोपला खेळ

घटना घडल्यानंतर पळापळ सुरू झाली, त्या वेळी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नितीन रावते यांचा मोबाईल ‘स्वीच ऑफ’ होता. रुग्णालयाचे इतर प्रमुख अधिकारी घटनास्थळी नव्हते. आयुक्त कैलास जाधवदेखील दोन तासांनी घटनास्थळी पोचले. नर्सेस, वॉर्डबॉय यांच्या भरवशावर रुग्णालयाचा कारभार चालत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. घटना घडल्यानंतर नोडल अधिकऱ्यांची भूमिका महत्त्वाची होती. तेच जागेवर नसल्याने पालिकेच्या रुग्णालयांचा कारभार ‘रामभरोसे’ असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. अर्धा तासात ऑक्सिजन पुरवठा योग्य रीतीने होण्याबरोबरच तणावाची स्थिती योग्य रितीने हाताळली असती तर काही प्रमाणात का होईना जीवितहानी टाळता आली असती.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : ती रुग्णवाहिका महिलेसाठी ठरली जीवनदायिनी..!

एक महिन्यातच तुटला पाइप

पुणे येथील टायो निप्पॉन सन्सो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दहा वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु होऊन दोनच महिने झाले असताना टाकीचा पाइप तुटल्याने निकृष्ट दर्जाचे साहित्य बसविले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटना घडली त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी मेन व्हॉल्व बंद केल्याने कंपनीचे तंत्रज्ञ कुठे होते असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अन् ऑक्सिजन पुरवठा सुरळीतचा पालिका प्रशासनाकडून खुलासा

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण असल्याची माहिती देताना ऑक्सिजन टाकीच्या खाली गळती झाल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली.प्रशासनाकडून खुलासा करताना म्हटले आहे, की दीडशे खाटांच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी (ता.२१) सकाळी १५७ रुग्ण दाखल होते, त्यापैकी १३१ रुग्ण ऑक्सिजनवर, १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर व ६१ रुग्ण क्रिटिकल होते. रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी १३ किलोलिटर लिक्विड ऑक्सिजन टॅंक तायको निप्पॉन कंपनीकडून दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आला आहे. देखभाल दुरुस्ती व लिक्विड ऑक्सिजन देण्याची जबाबदारीही कंपनीकडे आहे. ३१ मार्चला टँक कार्यान्वित करण्यात आला. बुधवारी (ता. २१) दुपारी साडेबाराला रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने पाहणी केली असता, टॅंकच्या खालच्या बाजूला गळती आढळली. त्यामुळे टॅंकमधील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांस पुरेशा दबावाने ऑक्सिजन मिळाला नाही. गळती दुरुस्तीसाठी शहरातील निखिल गॅसचे मालक शेटे व पिनॅकल कंपनीचे इंजिनिअर यांना तातडीने घटनास्थळी बोलविण्यात आले. फायर टेंडरमधून पाणी फवारणी करून ऑक्सिजन गळतीची जागा तज्ज्ञांनी शोधली. गळतीची पाहणी करून गळती होणाऱ्या पाइपाचा भाग दुरुस्त करून पुन्हा जोडणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचा ऑक्सिजनचा पुरवठा दुपारी दोनला सुरळीत करण्यात आला. दरम्यानच्या काळात तायको निप्पॉन या कंपनीचा लिक्विड ऑक्सिजनचा टँकर दैनंदिन लिक्विड ऑक्सिजन भरण्यासाठी स्थळावर आला होता व त्यामधून लिक्विड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आले.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

ठेकेदार कंपनीचे तंत्रज्ञ गायब

गेल्या वर्षी रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवल्यानंतर महापालिकेने स्वतःचा प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतला. पुणे येथील टायकोन कंपनीला ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम देण्यात आले. ऑक्सिजन पुरवठा करताना महापालिकेकडून ऑक्सिजन टाक्यांचे भाडेदेखील संबंधित ठेकेदार कंपनीला देण्याचा करार होता. करारानुसार ऑक्सिजन रिफिल करणे, देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदार कंपनीकडे होते. परंतु, बुधवारी (ता. २१) ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्या वेळी कंपनीचे तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याची बाब समोर येत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जबाबदार अधिकाऱ्यांसह कंपनीची चौकशी

गेल्या वर्षी कोरोना उच्चतम पातळीवर असताना मोठ्या प्रमाणात रुग्ण रुग्णालयांमध्ये भरती झाले होते. एकीकडे रुग्ण भरती होत असताना दुसरीकडे ऑक्सिजनचा पुरवठादेखील कमी होत असल्याची बाब समोर आली होती. काही खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने महापालिकेच्या मालकीचा स्वतःचा प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक अडथळे पार केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याचे काम सुरू झाले. बिटको रुग्णालयात १९ किलोलिटर, तर झाकिर हुसेन रुग्णालयात १३ किलोलिटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्सिजन प्लांट कायमस्वरूपी उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. प्लांट उभा करताना तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याने महापालिकेने पुणे येथील टाय निप्पॉन सॅन्सो कंपनीला देखभाल दुरुस्तीचे काम दिले. यात अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक अडथळे पार करत ऑक्सिजन प्लांट डिसेंबरमध्ये कार्यान्वित करण्यात आला. तीनशे खाटांना ऑक्सिजन पुरवठा होईल याप्रमाणे नियोजन करण्यात आले. महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांटला ऑक्सिजन पुरवण्यासाठी प्रतिकिलोमीटर १७ रुपये असा दर निश्चित करण्यात आला होता. त्याचबरोबर ऑक्सिजन टाकीचे भाडेदेखील महापालिका देणार, असे करारात नमूद करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ऑक्सिजन प्लांट चालवण्यासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याने संबंधित कंपनीने तंत्रज्ञांची नेमणूक करणे असे करारात नमूद करण्यात आले. आज मात्र ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्या वेळी तंत्रज्ञ जागेवर उपस्थित नसल्याची बाब समोर आली आहे. त्यानुसार तातडीने चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिले आहेत.