esakal | कोरोनामुळे मुले पालकांसोबत घरातच रमली; बैठे खेळांमुळे वाढला संवाद
sakal

बोलून बातमी शोधा

due to Corona children to spend time at home with their parents

कोरोनामुळे मुले पालकांसोबत घरातच रमली; बैठे खेळांमुळे वाढला संवाद

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : मौजमस्ती करण्यासाठी मुलांना उन्हाळी सुटीत मैदानी खेळांचे आकर्षण असते. त्यात क्रिकेट मित्रांसोबत सर्वाधिक खेळले जाते. परंतु, वर्षभरापासून मैदानी खेळ बंद असल्यामुळे बहुतेक मुले मोबाईलवरच खेळताना दिसली. घरात बैठ्या खेळामध्ये बौद्धिक व वैचारिक, सापसिडी, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम आदी प्रकार सर्वाधिक खेळले जात आहे. पालकही मुलाबरोबर खेळण्यासाठी वेळ काढत आहे. त्यामुळे मुले आणि पालकदेखील घरीच असल्याने त्यांच्यात संवाद वाढला आहे.

लॉकडाउनमुळे सलग दुसऱ्या वर्षी घरात बसण्याची वेळ मुलांवर आली आहे. ऑनलाइन शाळा सुरू झाल्यावर मुले घरी बसूनच शिक्षणाचा आनंद घेत होती, मात्र आता मुलांना उन्हाळी सुटी लागल्यामुळे मुलांनी खेळांना प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांनी मनोरंजन म्हणून विविध खेळांचा आधार घेतला आहे. घराबाहेर मैदानावर खेळणेही धोक्याचे असल्याने बंद आहेत. मुले घरात बसून विविध खेळाचा आनंद घेत आहेत. मुले टीव्हीवर विविध खेळ खेळत असून, पालकांसोबत अन्य खेळांत रमत आहेत. मुलांनाही घरात बसण्याची सवय जडली असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: कोरोना जाईना, लग्न ठरेना! नोकऱ्या गमावलेल्या ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा

पालक संतोष वाघमारे म्हणाले, की मुलाचे वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण सुरू होते. मुले काही बाहेर जाण्यासाठी हट्ट करतात. परंतु बाहेरची परिस्थिती बघता ते करणे आतातरी शक्य नाही. त्यामुळे घरातले जे बैठे खेळ आहेत, ते मुलांना आणून दिले असून, मुले त्यात रमली आहे. तर पालक मनीषा पवार म्हणाल्या, की मुले घरीच असल्यामुळे मुलांमध्ये रमता येत आहे. त्यामुळे संवाद वाढला आहे. त्यांच्या नेमक्या गरजा ओळखण्यास मदत झाली आहे.

शारीरिक श्रम कमी

कोरोनामुळे शाळा उघडल्या नाही, यामुळे मुले घरूनच ऑनलाइन शिक्षण घेत होते. आता उन्हाळी सुटी लागल्याने मुलांनी बैठे खेळ खेळण्याकडे पसंती दिली आहे. परंतु, मैदानावर खेळता येत नसल्याने मुलांचे शारीरिक श्रम कमी झाले. याचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. आता पुन्हा ‘ब्रेक द चेन’ मोहिमेमुळे चार भिंतीत बसण्याची वेळ मुलांवर आली असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली अनिश्चितता अशीच वर्षभरापासून कायम आहे. कोरोना अजूनही काही महिने आपली साथ सोडणार नसल्याचे दिसते. म्हणूनच या काळात मुलांसाठी मैदानी खेळ बंद असले तरी पालकांनी आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपत असतानाच मुलांमध्ये रमत मुलांचेसुद्धा मानसिक स्वास्थ्य जपायला हवे, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा: पुन्हा तीच व्यथा! आईच्या मृत्यूनंतर 7 दिवसांनी मुलाचीही अंत्ययात्रा