esakal | किटच्या तुटवड्यामुळे आता फक्त मनपा केंद्रावर रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट

बोलून बातमी शोधा

Rapid antigen test campaign
किटच्या तुटवड्यामुळे आता फक्त मनपा केंद्रावर रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : रेमडेसिव्हिर इंजेक्शन असो वा ऑक्सिजन अशा अनेक प्रकारच्या वैद्यकीय उपचारांचा तुटवडा भासत असताना आता शहरांमध्ये रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटचीही टंचाई जाणवू लागली असल्याची बाब समोर आली आहे. या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सध्या शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या टेस्ट बंद करून फक्त महापालिकेचे आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

अडीच महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या संकटामुळे महापालिकेच्या वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला. महापालिकेने शहराच्या लोकसंख्येनुसार यापूर्वी रुग्णालयांची व त्यात बेडची निर्मिती केली होती. या संकटामुळे महापालिकेकडे आता तब्बल एक हजार बेडचे रुग्णालय व कोविड सेंटर तयार झाले आहे. महापालिकेने सर्व लक्ष वैद्यकीय सेवेकडे केंद्रित केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे तत्काळ निदान व्हावे, यासाठी महापालिकेने वर्षभरापासून रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत तब्बल सव्वा लाख रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येकी पन्नास हजार अशा दोनदा रॅपिड टेस्ट किट खरेदी करण्यात आल्या. महापालिकेमार्फत उपलब्ध होत असल्याने नगरसेवकांनीदेखील यातून मोठी चमकोगिरी करत टेस्टिंग करून घेतल्या. एका अर्थाने ही बाब महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य सेवेवरचा ताण कमी करण्यास उपयुक्त ठरली हे खरे असले तरी अद्याप शहरात मोठ्या प्रमाणात नगरसेवकांच्या माध्यमातूनच रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केल्या जात आहेत. मात्र, आता किटचा तुटवडा जाणवू लागला असून, दोन दिवसांपासून शहरात टेस्ट बंद करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: संतापजनक प्रकार! जात पंचायतने महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा..

गल्लीबोळातील टेस्ट बंद होणार

खर्च महापालिकेचा; मात्र चमकोगिरी नगरसेवकांची, अशी परिस्थिती शहरात ॲन्टिजेन टेस्टच्या माध्यमातून सुरू आहे. टेस्टच्या माध्यमातून पॉझिटिव्ह रुग्ण शोधणे व त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची तपासणी करणे, हा हेतू आहे. परंतु सध्या नगरसेवकांकडून टेस्टच्या माध्यमातून उत्सव सुरू असल्याने किटचा तुटवडा भासत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेची ३० आरोग्य केंद्रे, डॉ. झाकिर हुसेन, नवीन बिटको रुग्णालय या महत्त्वाच्या केंद्रांवरील टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: दिंडोरीतील फुलशेती सलाइनवर! यंदाही हरपला गुलाबाचा टवटवीतपणा