नाशिक : राज्यातील ९४ हजार शिक्षकांच्या वेतनवाढीचा मार्ग सुकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

increasing salary

राज्यातील ९४ हजार शिक्षकांच्या वेतनवाढीचा मार्ग सुकर

नामपूर (जि. नाशिक) : राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवडश्रेणीचे लाभ मिळाले नाहीत अशा शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी इन्फोसिसची मदत होणार आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि इन्फोसिस यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाल्याने राज्यातील ९४ हजार शिक्षकांच्या वेतनवाढीचा मार्ग सुकर बनला आहे.

शिक्षकांना १२ वर्षे आणि २४ वर्षे सेवा झाल्यानंतर वरिष्ठ श्रेणी, तसेच निवडश्रेणी लागू होते. परंतु गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षण कार्यक्रम घेतला नसल्यामुळे हे लाभ देता येत नव्हते. हे प्रशिक्षण देण्याबाबत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने सातत्याने मागणी होत होती. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशिक्षण देणे शक्य झाले नाही.

राज्यातील सुमारे ४४ हजार शाळांमध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यांचा वापर वाढवून विद्यार्थी तंत्रस्नेही व्हावेत, यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्षात शाळेचे वर्ग भरविणे शक्य नसल्याने विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. भविष्यात राज्यातील शासकीय शाळा डिजिटल करणे, शाळांमध्ये रोबोटिक प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा उभारणे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सहजरीत्या आत्मसात करता यावी, यासाठी इन्फोसिसने सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; CET परीक्षेच्या तारखा जाहीर

नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलमार्फत शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाकरिता शिक्षकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी कशी करावी व त्याविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण याविषयीची माहिती देणारे पत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नुकतेच निर्गमित केलेले आहे.

हेही वाचा: NET : 'नेट’साठी अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात

"जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी लागू करण्याबाबतचे घोंगडे भिजत पडले आहे. अनेक शिक्षक निवृत्त होऊनही त्यांना निवडश्रेणीचा लाभ मिळू शकला नाही. बागलाण तालुक्यातून सुमारे २६० शिक्षकांचे निवडश्रेणीचे प्रस्ताव पदवीधर शिक्षक संघटनेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. प्रस्ताव तातडीने मंजूर व्हावेत, यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत."

-प्रभाकर भामरे, तालुकाध्यक्ष, पदवीधर शिक्षक संघटना, बागलाण

Web Title: Easy Way To Increase The Salaries Of 94000 Teachers In The State Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top