esakal | ना मेंटेनन्स, ना मजुरी; चांदवडच्या युवा शेतकऱ्याची ‘आयडियाची कल्पना!
sakal

बोलून बातमी शोधा

Mulching paper

शेतकऱ्याची आयडियाची कल्पना सध्या चांगलीच चर्चेत आहे. तालुक्यातील आडगाव टप्पा येथील तरुण शेतकऱ्याने केवळ पाच हजार रुपयात मल्चिंग पेपर अंथरणारे मशिन बनविले आहे.

ना मेंटेनन्स, ना मजुरी; चांदवडच्या युवा शेतकऱ्याची ‘आयडियाची कल्पना!

sakal_logo
By
भाऊसाहेब गोसावी

चांदवड (जि. नाशिक) : चांदवडच्या शेतकऱ्याची आयडियाची कल्पना सध्या चांगलीच चर्चेत आहे. तालुक्यातील आडगाव टप्पा येथील तरुण शेतकऱ्याने केवळ पाच हजार रुपयात मल्चिंग पेपर अंथरणारे मशिन बनविले आहे. त्याच्या या कामाचे कौतुक होत आहे. (farmer made mulching paper wrapping machine at only 5 thousand)

मेंटेनन्स देखील लागत नाही

सध्या सर्वत्र शेतकऱ्यांची टोमॅटो लागवडीसाठी शेतीची मशागत, शेत तयार झाल्यानंतर सरी पाडणे व सरीवर मल्चिंग अंथरणे ही कामे सुरू आहेत. यात मल्चिंग अंथरणे हे महागडे व जास्त मजुरांचे किंवा ट्रॅक्टरचलित यंत्राचेच काम आहे. आडगावच्या नितीन घुलेंचीही लगबग सुरू आहे. कोरोनाच्या काळात मजुरांनी मल्चिंग पेपर अंथरायला नकार दिला. मल्चिंग पेपर अंथरायला सहा मजूर लागतात. पण मजूर काही मिळत नव्हते. आडगाव टप्पा येथील तरुण शेतकरी नितीन घुले यांना या अडचणींवर मात करण्यासाठी कल्पना सुचली अन् त्यांच्या कल्पनेतून अत्यंत कमी बजेटमध्ये मल्चिंग पेपर अंथरणारे मशिन साकार झाले. हे मशिन घरीच बनविले असून, त्याला केवळ पाच हजार रुपये खर्च आला. शिवाय याचा विशेष मेंटेनन्सदेखील करावा लागत नाही. यामुळे मजुरी वाचते पण ट्रॅक्टरला महागडे मशिन घ्यावे लागत नाही. शिवाय वेळेचीही बचत होते.

हेही वाचा: अजंगची सासुरवाशीण मुंबईत लोको पायलट!

नवीन काम करण्यावर भर

हे मशिन अतिशय हलके असून, हाताने दोन माणसे सहज ओढू शकतात. पेपरदेखील एकसारखा अंथरला जातो. हार्डवेअर दुकानातून काही भाग आणून एका स्थानिक मित्राच्या मदतीने त्यांनी घरीच वेल्डिंग करून हे मशिन बनविले. नितीन घुले स्वतः प्राथमिक शिक्षक आहेत. ते सध्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर, धोंडगव्हाण या शाळेत कार्यरत आहेत. आई-वडिलांना एकटेच असल्याने शाळेसोबत शेतीची जबाबदारीही त्यांना सांभाळावी लागते. त्यामुळे सतत नावीन्यपूर्ण काहीतरी करत राहण्यावर त्यांचा भर असतो.

हेही वाचा: काजव्यांच्या लुकलुकला मुकणार पर्यटक! वन्यजीवगणनाही रद्द

''मजूरटंचाईवर मात करण्यासाठी हे मशिन फारच उपयुक्त आहे. यामुळे वेळेची व पैशाची बचत होणार असल्याने भाजीपाला पिकांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. भविष्यात शेतकऱ्यांना हे मशिन उपलब्ध करून देणार आहे.''

-नितीन घुले, आडगाव टप्पा, चांदवड

(farmer made mulching paper wrapping machine at only 5 thousand)