बाजार समितीचे ॲप करणार बळीराजाची सुरक्षा! घरबसल्या शेतकऱ्यांना कळणार बाजारभाव 

farmer online.jpg
farmer online.jpg
Updated on

म्हसरूळ (जि.नाशिक) : नाशिक बाजार समितीत तोतया व्यापाऱ्यांकडून बळीराजाची होणारी फसवणूक वा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असो, आता या सर्वच समस्यांवर नाशिक बाजार समितीने उपाय शोधला आहे. एका ॲपच्या माध्यमातून बळीराजाची सुरक्षा करण्याचा प्रयत्न संचालकांनी केला आहे. 
नाशिक बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक ॲप तयार केले आहे. विशेष म्हणजे ॲपच्या माध्यमातून दैनंदिन शेतमालाचे बाजारभाव क्षणात समजतील.

बाजारभाव दोन सत्रांत प्रसिद्ध केला जाईल
नाशिक बाजार समिती शेतकऱ्यांची आहे. या ठिकाणी नाशिक जिल्ह्यासह परजिल्ह्यातून पाले व फळभाज्या घेऊन शेतकरी येतात. कांदा, बटाटा, लसूण व फळेही येतात. शेतकऱ्याची सुरक्षितता व त्यांची बाजार समिती आवाराबाहेर होणारी फसवणूक टाळावी, यासाठी सभापती देवीदास पिंगळे यांच्या संकल्पनेतून नाशिक बाजार समिती ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. बाजार समितीत फळभाज्या, पालेभाज्या, कांदा, लसूण, बटाटा यास मिळालेला बाजारभाव दोन सत्रांत प्रसिद्ध केला जाईल, जेणेकरून शेतकऱ्यास शेतमालास मिळालेला बाजारभाव माहिती उपलब्ध होईल. सद्यःस्थितीत नियमनमुक्तीमुळे व्यापारी शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करू लागला आहे. यात बाजारात शेतमालास काय बाजारभाव मिळतो, याची शेतकऱ्यास माहिती नसते. त्यामुळे आलेला व्यापारी कवडीमोल भावात शेतमाल खरेदी करतो. परिणामी, शेतकऱ्याचे नुकसान होते. शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीने या ॲपची निर्मिती केली आहे. 

शेतकऱ्याला करता येणार तक्रार 
नाशिक बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यास कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागू नये, तसेच आवारात लिलाव प्रक्रियेदरम्यान व्यापारी, अडते, हमाल किंवा अन्य कुणाकडून काही अडचण भासल्यास संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांशी या ॲपच्या माध्यमातून संपर्क साधता येणार आहे. 


शेतकरी डायरेक्ट कनेक्ट टू संचालक 
बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यास अडचण आल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधला आणि त्यास काही प्रतिसाद किंवा वेळीच मदत मिळत नसेल, तर शेतकरी या ॲपच्या माध्यमातून ‘डायरेक्ट कनेक्ट टू सभापती, संचालक मंडळ’ असे नियोजन केले आहे. जेणेकरून समस्या किंवा अडचणी तत्काळ दूर करत शेतकऱ्यास प्रतिसाद न देणाऱ्या कर्मचाऱ्याची तक्रारही करता येणार आहे. 

ॲप विनामूल्य 
शेतकऱ्यांसाठी ॲप विनामूल्य देण्यात येणार आहे. ॲपची निर्मिती स्टॅटिक जीएसएमचे संचालक गौरव मुंगसे यांनी केली असून, सदस्य प्रक्रिया अगदी सुलभ केली आहे. अँड्रॉइड मोबाईलमधील प्लेस्टोअरवर ‘नाशिक बाजार समिती’ असे नाव टाकल्यास ॲप ओपन होईल. त्यानंतर ते डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करता येईल.

शनिवारी (ता. ६) संचालक मंडळाच्या उपस्थितीत सभापती देवीदास पिंगळे यांच्या हस्ते या ॲपचे उद्‌घाटन झाले. उपसभापती रवींद्र भोये, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, संपतराव सकाळे, विश्वास नागरे, युवराज कोठुळे, संजय तुंगार, भाऊसाहेब खांडबहाले, श्याम गावित, संदीप पाटील, चंद्रकांत निकम, प्रवीण नागरे, विनायक माळेकर आदी उपस्थित होते.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com