यंदातरी पीकविम्याची रक्कम मिळणार का? शेतकऱ्यांचा सवाल | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers affected by unseasonal rains are waiting for crop insurance

यंदातरी पीकविम्याची रक्कम मिळणार का? शेतकऱ्यांचा सवाल

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यात तीन वर्षांपासून खरिपाच्या अखेरीस बेमोसमी पाऊस थैमान घालत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गतवर्षी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही पिकविमा मिळालेला नाही. त्यातच यंदाही पावसाने नुकसान झाल्याने यंदा तरी पिकविमा मिळेल का? लोकप्रतिनिधी त्यासाठी काही प्रयत्न करणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पीकविम्याची दमडीही मिळाली नाही

गेल्या पंधरवड्यात ऐन दिवाळीत भात कापणी जोरावर असताना बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पुरती धावपळ झाली. शेतातील-खळ्यावरील धान सुरक्षित ठिकाणी साठवतांना शेतकऱ्यांचे नाकी-नऊ आले. पावसामुळे भाताला शेतातच मोड आले होते. खरीप हंगामातील धानाचा पीक विमा काढला होता. शेतकऱ्यांनी पंचनामे त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी सरसकट नुकसानभरपाई देण्यासाठी शासन दरबारी विनवणी केली. सुज्ञ व शिक्षित शेतकऱ्यांनी पीकविम्याचा अँपवर स्वतः पंचनामा केला. कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक आदींनी पंचनामे करून शासनाकडे पूर्तता करून सोपवले. मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरपाई अथवा पीकविम्याची दमडीही मिळाली नसल्याची स्थिती आहे. पंचनामे करूनही भरपाई अथवा विमापरतावा मिळत नसेल तर कागदी घोडे नाचवून फायदा तरी काय? असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांना पडला आहे.

हेही वाचा: पात्र असूनही पोलिस भरतीत अपात्र ठरला; न्याय मिळेल का?

हेही वाचा: रेशन दुकानातून आता चहा-कॉफीचीही विक्री

loading image
go to top