esakal | नाशिकमध्ये स्मशानभूमीसाठी नवीन जागेचा शोध महापालिकेकडून घेतला जात आहे

बोलून बातमी शोधा

crimination in nashik

नाशिकला अंत्यसंस्कारासाठीही 'वेटिंग'! स्मशानभूमीसाठी नवीन जागेचा शोध

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याने शहरातील सर्वच स्मशानभूमीमध्ये मृतदेह वेटिंगवर आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर पर्याय म्हणून स्मशानभूमीसाठी नवीन जागेचा शोध महापालिकेकडून घेतला जात आहे.

घाटांवर अंत्यसंस्कार

शहरात सतरा अमरधाम मिळून अंत्यसंस्कारासाठी ७० बेड उपलब्ध आहेत. त्याशिवाय विद्युत व गॅस दाहिनीवरही दहन केले जात आहे. शहर, ग्रामीण भागासह उत्तर महाराष्ट्रातील अंत्यसंस्कारदेखील नाशिक अमरधाममध्ये होत असल्याने मिळेल त्या जागेवर सरण रचून अंत्यसंस्कार केले जात आहेत. एका जागेवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दोन तासांत त्या जागेवर नवीन अंत्यसंस्काराची तयारी करावी लागत असल्याने जागा अपुरी पडत आहे. अंत्यसंस्काराचे वेटिंग थांबविण्यासाठी नवीन जागेचा शोध घेतला जात असून, नाशिक अमरधामच्या वरच्या बाजूला असलेल्या जागेत किंवा सिंहस्थात कन्नमवार पुलापर्यंत बांधण्यात आलेल्या घाटांवर अंत्यसंस्कारासाठी परवानगी देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

हेही वाचा: जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट! ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येने गाठला उच्चांक

अमरधाममध्ये सर्वाधिक अंत्यसंस्कार

शहरात कोरोना संसर्गवाढीचा वेग अद्यापही कायम असून, रविवारपर्यंत शहरात एक लाख साठ हजारांच्या वर कोविड रुग्णांची नोंद झाली. मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत सर्वाधिक रुग्ण आढळून आले. या दीड महिन्याच्या कालावधीत शहर व जिल्हा मिळून ६७ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असताना मृतांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. १ ते १६ एप्रिल यादरम्यान शहरात सरणावर जाळण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या दोन हजार ३६० नोंदविली गेली. यातील एक हजार ७९३ कोविडमुळे मृत झाले आहेत. पंचवटी व पूर्व विभागातील म्हणजे नाशिक अमरधाममध्ये सर्वाधिक अंत्यसंस्कार होत आहेत.

हेही वाचा: नाशिककरांसाठी धोक्याची घंटा! लिक्विड ऑक्सिजन मिळण्याचे प्रमाण झाले कमी