esakal | मुद्रांक शुल्कातून चार महिन्यांत कोटींचा महसूल; सहाय्यक निबंधक कार्यालयाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

stamp-duty.jpg

एप्रिल ते ऑगस्टपर्यंत ओस पडलेले पिंपळगावचे सहाय्यक निबंधक कार्यालय दस्त नोंदणीसाठी नागरिकांच्या गर्दीने गजबजले आहे. ३१ डिसेंबरपर्यंतच ही मुदत होती. आता जानेवारी ते मार्च या काळात मुद्रांक शुल्क सवलत तीन टक्क्यांवरून दोन टक्के झाली आहे. 

मुद्रांक शुल्कातून चार महिन्यांत कोटींचा महसूल; सहाय्यक निबंधक कार्यालयाची माहिती

sakal_logo
By
दिपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : कोरोनाच्या महासंकटामुळे ठप्प झालेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी शासनाने सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत मुद्रांक शुल्कात निम्मी सवलत दिली. या आकर्षक योजनेचा लाभ घेत स्थावर मालमत्ता खरेदीदारांनी कोट्यवधींची सवलत पदरात पाडून घेतली. शिवाय एकट्या पिंपळगाव बसवंत सहाय्यक निबंधक कार्यालयातून शासनाला चार महिन्यांत पाच कोटींचा महसूल मिळवून दिला आहे. 

रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल

यंदा कोरोनामुले सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला. त्यातच नवीन आर्थिक वर्षाची सुरवातही लॉकडाउनमुळे तीन महिने उशिराच झाली. त्यामुळे बांधकाम क्षेत्र, रिअल इस्टेट क्षेत्र ठप्प झाले. परिणामी, महसुलाचा गाडा रुतला. त्याला गती देण्यासाठी शासनाने १ सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली. मुळात सहा टक्के मुद्रांक शुल्कात निम्मी सवलत दिल्याने शासनाला फटका बसला असला तरी अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली आहे. रिअल इस्टेटसाठी शासनाची सलवत योजना ‘बूस्टर डोस’ ठरल्याचे चित्र आहे. मुद्रांक शुल्कांत थेट तीन टक्क्यांपर्यंत सवलत मिळाल्यामुळे दसरा, दिवाळीला रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल झाली. 

मुद्रांक शुल्क सवलत तीन टक्क्यांवरून दोन टक्के

पिंपळगाव बसवंत, ओझर, कसबे सुकेणे येथे घर, जागा तर ग्रामीण भागात जमीन खरेदीत सवलत निर्माण झाल्याने सामान्यांच्या आवाक्यात खरेदीचा खर्च आला. स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीकडे लोकांचा कल वाढण्यास मुद्रांक शुल्क सवलत निर्णायक ठरली. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत दस्त नोंदणी सुमारे दीडपटीने वाढली आहे. तर सवलतीमुळे महसूल कमी झाला असला तरी शासनाच्या तिजोरीत एकट्या पिंपळगाव बसवंत परिसराने पाच कोटींची भर टाकली आहे. एप्रिल ते ऑगस्टपर्यंत ओस पडलेले पिंपळगावचे सहाय्यक निबंधक कार्यालय दस्त नोंदणीसाठी नागरिकांच्या गर्दीने गजबजले आहे. ३१ डिसेंबरपर्यंतच ही मुदत होती. आता जानेवारी ते मार्च या काळात मुद्रांक शुल्क सवलत तीन टक्क्यांवरून दोन टक्के झाली आहे. 

हेही वाचा >  चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

शासनाने मुद्रांक शुल्कांत तीन टक्के सवलत दिल्याने दस्त नोंदणीस गर्दी होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूल कमी दिसत असला तरी सवलतीचा फायदा घेत दस्त नोंदणी दीडपटीपेक्षा जास्त झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत एक हजार नोंदणी झाली. यंदा त्याच काळात एक हजार २३५ नोंद झाली. एकट्या डिसेंबरमध्येच तब्बल ४१८ दस्ताची नोंद झाली. कोरोनामुळे थांबलेले व्यवहार शासनाच्या योजनेने अधिक गतिमान झाल्याचे दिसते. - संजय गांगुर्डे, सहाय्यक निबंधक, पिंपळगाव बसवंत 

शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली. दस्त नोंदणी कार्यालयात गर्दी वाढली असली तरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले. त्यामुळे गोंधळ न होता सुलभ पद्धतीने नोंदणी केली जात आहे. - योगेश चांडक, बांधकाम व्यावसायिक, ओझर 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

गेल्या चार महिन्यांतील दस्त नोंदणी व महसूल 

महिना दस्तसंख्या नोंदणी फी व मुद्रांक शुल्क एकूण रक्कम 

सप्टेंबर २९६ ९७ लाख ६४ हजार 

ऑक्टोबर २७९ ९७ लाख २४ हजार 

नोव्हेंबर २४२ एक कोटी ६ लाख 

डिसेंबर ४१८ दोन कोटी १० लाख