
Ganeshotsav 2022 : राणेनगरच्या Unique गणेश महोत्सवाला तुफान गर्दी
इंदिरानगर (जि. नाशिक) : संपूर्ण शहरभर वेगळेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या राजीवनगरमधील युनिक ग्रुपने युनिक मैदानात उभारलेल्या गणेशोत्सवाला तुफान गर्दी होत असून, या ठिकाणी भरविलेल्या आनंद मेळ्यामधील खेळण्यांचा लाभ घेण्यासाठी अक्षरश: नागरिकांना वेटिंग करावे लागत आहे. (Ganeshotsav 2022 Ranenagar Unique Ganesha Festival Gets Crowded Nashik Latest Marathi News)
माजी सभागृह नेता तथा मंडळाचे संस्थापक सतीश सोनवणे, भाजयुमोचे द्वारका मंडलचे सरचिटणीस अनिकेत सोनवणे आणि युनिक महिला ग्रुपच्या संस्थापिका अनिता सोनवणे यांनी हा महोत्सव भरविला आहे. बचत गट आणि घरगुती व्यावसायिक महिलांसाठी उभारलेले खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंच्या स्टॉलवर होणारे गर्दी आटोक्यात आणताना मंडळाच्या कार्यकर्त्यांची अक्षरशः दमछाक होत आहे.
यंदा मंडळाने बाप्पांना छत्रपती शिवाजी महाराज, श्री खंडेराव महाराज, शिवशंकर, गुरुदेव दत्त यांच्या रूपात प्रस्तूत करण्याचे नियोजन केले आहे. बुधवारी (ता. ७) ‘वारकरीरूपी गणेश’ या ठिकाणी अवतारणार असून, या वेळी रिंगण सोहळा होणार आहे. त्यासाठी त्रंबकेश्वर येथील १०१ विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मंगळवारी (ता. ६) गणेशाला ७५ भोग लावण्यात येणार आहेत. श्रीराम शिवकालीन मर्दानी खेळ आखाड्यातर्फे आनंद ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर होणार आहेत.
कीर्ती भवाळकर यांचे कथ्थक नृत्य, नारायण महाराज आळंदीकर यांचे कीर्तन, नवचैतन्य महिला भजनी मंडळाचे सादरीकरण, असे एकाहून एक सरस कार्यक्रम होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, नृत्य, महिलांसाठी पाककला, अथर्वशीर्ष पठाण आदी भरगच्च कार्यक्रम होणार असून, विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. गुरुवारी (ता. ८) रात्री आठला बक्षीस वितरण होणार आहे.
दरम्यान, रोजच्या महाआरतीसाठी परिसरातील पत्रकार, गुरुदेव दत्त मित्रमंडळ, राजसारथी सोसायटी पदाधिकारी, निर्मल हास्य क्लब, लाईफ मिशन, समर्थ, शतायुषी, कृतार्थ, जीवन प्रवास, सन्मित्र ज्येष्ठ नागरिक संघासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रत्युषा महिला भजनी मंडळ, निर्मल हास्य क्लब आदी सदस्यांना मान दिला आहे. मंडळाचे अध्यक्ष शैलेश कुलकर्णी, रोहित परब, विशाल सांगळे, योगेश जाधव, किशोर शिरसाट, महेंद्रसिंग राजपूत, राजेश सायंकर, कुणाल नाईक, अनिल जाचक आदी संयोजन करीत आहेत.