लग्नसराईनंतर आता गणेशोत्सव बँडविना; बँड व ढोलपथकांवर उपासमारीची वेळ

Band
Band

नाशिक / कळवण : यंदा प्रथमच कोरोनामुळे लग्नसराईसोबतच गणेशोत्सवाच्या ऑर्डर नसल्याने जिल्ह्यातील बँड व ढोलपथकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील पाच ते सात हजार कलावंतांचा रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. दर वर्षी तीन-चार महिने आधीपासून ऑर्डर मिळविणाऱ्या कलावंतांसमोर गणेशोत्सवात बेकारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कलावंतांवर उपासमारीची वेळ, तर मालकांचे आर्थिक नुकसान

शहरी व ग्रामीण भागासह आदिवासी भागात बँड पार्ट्यांची संख्या जास्त असून, आदिवासी कलाकारांच्या कलागुणांमुळे व आवडीमुळे अनेक गावांत बँड पार्टीची निर्मिती झाली. गाडी घेण्यापासून ते गाडी बनविण्यापर्यंत साधारण बँड पथकाला सुमारे १५ ते ७० लाखांपर्यंत खर्च येतो. यात गाडी, लायटिंग, जनरेटर, वाद्ये, साउंड सिस्टिम, ॲल्युमिनिअम सेक्शन, रेडियम, कलर आदींसह गायक, वादक व इतर कलाकारांचे मानधन असा खर्च होतो.

लग्नसराईनंतर गणेशोत्सव बँडविना

कोरोनामुळे जिल्ह्यात बँजो, बॅंड, सनई-चौघडा, ढोलबाजा व हलगीवादन करणाऱ्या कलावंतांचे हाल सुरू आहेत. लॉकडाउनमुळे सर्वांत मोठा लग्नसराईच्या सीझन तसाच गेला. मंदिरे बंद झाल्याने जत्रा, यात्रा व इतर धार्मिक कामे बंद होती. या स्थितीत या कलावंतांनी हमाली व मोलमजुरी करून, भाजीपाला विकून घर चालविण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. आता गणेशोत्सवात मिरवणुका निघणार नसल्याने बँडमालक व कलावंतांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षापासून बँडपथकातील कलावंतांना आगाऊ मानधन दिले आहे. सद्यःस्थितीत बँड बंद असल्याने मोठा फटका बसला आहे. काम नसल्याने वादक जमेल तेथे जाऊन, बांधकाम, शेतात मजुरी, भाजीपाला विक्री अशी कामे करीत आहेत. प्रशासनाने बँडपथकांना सोशल डिस्टन्स, नियम पाळून परवानगी दिली, तर काम मिळू शकते.- बापू पाटील, संचालक, न्यू गोल्डन ब्रास बँड, दह्याने

जिल्ह्यातील एकूण संख्या ७४१
कळवण ९५
सटाणा ७५
देवळा ४९
मालेगाव ७०
सुरगाणा ५३
दिंडोरी ५०
चांदवड ४०
नांदगाव ४३
निफाड ५३
सिन्नर ४४
पेठ ४८

एक पार्टी : १५ ते २५ कलाकार
एकूण रोजगार उपलब्ध : १२ हजार ४६०
गुंतवणूक : सुमारे १२४ कोटी रुपये
उलाढाल प्रतिवर्षी सुमारे १५० ते २०० कोटी

संपादन : रमेश चौधरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com