गोदेचा पहिलाच पूर पाहण्यासाठी उसळली गर्दी: चारला रामसेतू पाण्याखाली

Nashik Godaghat during flood Latest monsoon news
Nashik Godaghat during flood Latest monsoon newsesakal

नाशिक : गत चार दिवसांपासून कोसळणाऱ्या धो- धो पावसानंतर (Heavy Rain) गंगापूर धरणात पन्नास टक्क्याहून अधिक जलसाठा झाल्यामुळे पाटबंधारे विभागाकडून गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

त्यामुळे सोमवारी (ता. ११) दुपारी चार वाजता नदीकाठच्या अनेक मंदिरांसह नाशिक पंचवटीत दुवा साधणारा रामसेतू पाण्याखाली गेला. गोदेला आलेला पहिलाच पूर (Flood) पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान, पाणीपातळीत वाढ होऊ लागताच नदीकाठच्या टपऱ्या हटविण्यासाठी विक्रेत्यांची लगबग सुरू होती. (Godavari first flood Ramsetu under water Nashik Latest Monsoon Update News)

अवघ्या चार दिवसांपर्यंत पाणी टंचाईचे गडद संकट नाशिककरांवर ओढवलेले असताना त्यानंतर सुरू झालेल्या धुवाधार पावसानंतर गोदावरीला यंदा प्रथमच आलेला पूर पाहण्यासाठी आबालवृद्ध नाशिककरांनी गाडगे महाराज पूल, अहिल्यादेवी होळकर पूल आदी ठिकाणी मोठी गर्दी केली होती. गोदेच्या पुराचे मुख्य परिमाण समजला जाणारा रामकुंडाजवळील दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी पोचले होते.

विक्रेत्यांची धावपळ

गोदावरीच्या दुतर्फा अनेक व्यावसायिक टपऱ्यांद्वारे व्यवसाय करतात. पाणी पातळीत वाढ होऊ लागताच या व्यावसायिकांची टपऱ्या हलविण्याची लगबग सुरू होती. या टपऱ्या हलवून सुरक्षित जागी ठेवण्यासाठी विक्रेत्यांची कुटुंब, मित्रमंडळीसंह धावपळ सुरू होती. पावसामुळे आधीच व्यवसाय ठप्प झालेले असताना आता पुन्हा टपऱ्या हलविण्यासाठी मोठा खर्च करावा लागल्याची प्रतिक्रिया रामसेतू, रामकुंड परिसरात व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

गाडगे महाराज पूल बनला सेल्फी पॉइंट

पाणी पातळीत वाढ झाल्यावर दुपारनंतर गाडगे महाराज पुलावर पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली. यात तरुणांची संख्या मोठी होती. या वेळी अनेकांत पाण्याबरोबर सेल्फी घेण्यास पसंती दिली. मात्र, हे करताना अनेकजण जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून आले. रामसेतूवरही काही हौशी जीव धोक्यात घालून सेल्फी घेत होते, परंतु पाणीपातळी वाढू लागताच पोलिस व महापालिका कर्मचाऱ्यांनी रामसेतूवर जाण्यास मज्जाव केला.

Nashik Godaghat during flood Latest monsoon news
संततधार पावसाने जनजीवन विस्कळित; ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

धार्मिक विधींना अडसर

श्राद्धादी विधीसाठी रामकुंडावर बारमाही गर्दी असते. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पाणी पातळीत वाढ होण्यास सुरवात झाली. त्यामुळे पोलिसांसह महापालिका कर्मचाऱ्यांनी धार्मिक विधीसाठी आलेल्यांसह पुरोहितांना पूजा लवकर आटोपण्याचा सल्ला दिला. साडेदहानंतर पाणीपातळीत वाढ झाल्यावर अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी काठावर विधी करण्यास पसंती दिली.

व्यावसायिकांत भीती

गत महापुरात सराफ बाजार, भांडी बाजार, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, सरदार चौक या नदीकाठच्या भागात पुराचे पाणी पोचून व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. गत चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याने या व्यावसायिकांत गत स्मृतीमुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे यंदा अनेकांनी पाण्याच्या वाढत्या पातळीकडे लक्ष ठेवत विशेष काळजी घेतल्याचे व्यावसायिकांनी ‘सकाळ’ला सांगितले.

गाड्या हलविल्या

अलीकडे कानडे मारुती लेन, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक हा परिसर ‘बिझनेस हब’ बनला आहे. याठिकाणी पार्किंगची समस्या असल्याने अनेकजण गंगाघाट, गाडगे महाराज पूल या ठिकाणी वाहने पार्क करतात. गतवर्षीच्या पुरात अनेक वाहने गाडगे महाराज पुलाखाली पुरात अकाली होती. तो अनुभव लक्षात घेत आज अनेकांनी पाणीपातळी वाढण्यापूर्वीच वाहने हलविली. तरीही गाडगे महाराज पुलाखालील एक चारचाकी पाणी वाढल्यावर मोठ्या मुश्‍किलीने बाहेर काढण्यात आली.

स्मार्ट कामांचे काय होणार?

स्मार्ट सिटी कंपनीकडून गोदाघाटाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. यात घाटाच्या पायऱ्यांसह नदीकाठी दगडी फरशा बसविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. गतवर्षी आलेल्या नियमित पुरात अनेक फरशा वाहून गेल्या होत्या. सध्या पाऊस सुरूच असल्याने पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे या पुरात घाईघाईत उरकण्यात आलेली स्मार्ट कामे टिकाव धरणार का, असा प्रश्‍न याविरोधात लढा उभारणाऱ्या जागरूक पर्यावरणप्रेमींनी केला आह

Nashik Godaghat during flood Latest monsoon news
Nashik : महामार्गावर शून्य अपघातासाठी ‘मूव्हिंग बॅरिकेडिंगं‌’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com