Gram Panchayat Election 2022 : सिन्नरला 12 ग्रामपंचायतीसाठी 82 टक्के मतदान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crowd for Gram Panchayat voting here

Gram Panchayat Election 2022 : सिन्नरला 12 ग्रामपंचायतीसाठी 82 टक्के मतदान!

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यपदाच्या ८८ जागांसाठी रविवारी (ता.१८) शांततेत मतदान पार पडले. तालुक्यातील २६ हजार ६८४ पैकी २२ हजार ११७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील ४८ मतदान केंद्रावर ८२.८८ टक्के मतदान झाले. (Gram Panchayat Election 2022 82 percent voting for 12 Gram Panchayats in Sinnar)

तालुक्यातील आशापूर, कृष्णनगर, कीर्तांगळी, कारवाडी, शास्त्रीनगर, नांदूरशिंगोटे, पाटपिंप्री, शहा, सायाळे, ठाणगाव, उजनी आणि वडगावपिंगळा या बारा ग्रामपंचायतीच्या १२ थेट सरपंचपदासह ८८ सदस्यपदासाठी मतदान पार पडले. सदस्यपदाच्या २४ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. ग्रामीण भागात रब्बी हंगामाची कामे सुरु असल्याने सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी दिसून आला. पूर्व भागातील शहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक अडचण आल्याने मशिन बदलून द्यावे लागले.

सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत दोन तासात १५.८२ टक्के मतदारांनी मतदान केले होते. परंतु दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याचे दिसून आले. साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींची टक्केवारी ७३.३९ टक्के गेली होती शेवटचे दोन तास प्रत्येक ठिकाणी मतदानासाठी गर्दी झाली.

तालुक्यातील २६ हजार ६८४ पैकी २२ हजार ११७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तहसीलदार एकनाथ बंगाळे, नायब तहसीलदार सागर मुंदडा, उपविभागीय अधिकारी पोलिस सोमनाथ तांबे, सिन्नरचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, वावीचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिस यंत्रणेने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

हेही वाचा: Gram panchayat Election : येवला तालुक्यात शेती कामातून वेळ काढत मतदार राजा मतदानासाठी केंद्रावर!

सायाळेत पोलिसांचा सौम्य लाठीमार...

पूर्व भागातील सायाळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अत्यंत चुरस बघायला मिळाली. बाहेरगावातील मतदारांची नावे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत समाविष्ट झाल्याने दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. हे मतदार मतदानासाठी आल्यानंतर त्यांना मतदान करण्यास एका गटाने आक्षेप घेतल्यावर वादाचा प्रसंग उद्भवला. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावास पांगवले.

मतदारांची बहिष्कार

ठाणगाव ग्रामपंचायत समाविष्ट असलेल्या घुटेवाडी येथील ७० मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. वाडीत कोणत्याही प्रकारची विकास कामे यापूर्वीच्या काळात झाली नाहीत. पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांपासून वंचित रहावं लागत असल्याने मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हेही वाचा: Gram Panchayat Election : प्रतिष्ठेच्या लढतीत पिंपळगावला 72 टक्के मतदान!

ग्रामपंचायत निहाय झालेले मतदान (कंसात टक्केवारी)

आशापुर : १०५२ पैकी ८३५ (७९.३७ टक्के)

कृष्ण नगर (डुबेरवाडी) : १५४१ पैकी १३५८ (८८.१२ टक्के )

कीर्तागंळी : १९०६ पैकी १७२० (९०.२४ टक्के)

कारवाडी : १२१३ पैकी ९८४ (८१.१२ टक्के)

शास्त्रीनगर : ११०८ पैकी १०४९ (९४.६७ टक्के)

नांदूर शिंगोटे : ५००९ पैकी ४०५४ (८०.९३ टक्के)

पाटपिंपरी : २०९१ पैकी १७९९ (८६.०३ टक्के)

शहा : २४३६ पैकी २००२ (८२.१८ टक्के)

सायाळे : १६८२ पैकी १४०५ (८३.५३ टक्के)

ठाणगाव : ४५०० पैकी ३३३२ (७४ टक्के)

उजनी : ११६० पैकी १००५ (८६.६३ टक्के)

वडगाव पिंगळा : २९८६ पैकी २५७४ (८६.२० टक्के)

हेही वाचा: Dhule News : लव्ह जिहादला विराट मोर्चातून विरोध!; जनआक्रोशातून धर्मांतरालाही हरकत