VIDEO : शाब्बास..पठ्ठ्या हर्षवर्धन! पंचवीस वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली.. 

Harshavardhan-Sadgir-Maharashtra-kesari-.jpg
Harshavardhan-Sadgir-Maharashtra-kesari-.jpg

नाशिक : महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात पहिल्यांदाच हर्षवर्धन सदगीरच्या रूपाने नाशिकला "चांदीची गदा' मिळाली आहे. हर्षवर्धनचे गुरू आणि भगूरमधील बलकवडे व्यायामशाळेचे प्रमुख गोरखनाथ बलकवडे यांनी 25 वर्षांपूर्वी ही गदा मिळावी म्हणून प्रयत्न केला होता. त्यानंतर येवल्याचे राजू लोणारी, मुलगा विशाल आणि उत्तम दळवी या मल्लांच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. अखेर हर्षवर्धनने मंगळवारी (ता. 7) व्यायामशाळेचे हे स्वप्न साकार केले. 

कुस्तीचे प्रेम गप्प बसू देत नव्हते...

हर्षवर्धन मूळचा कोंभाळणे (ता. अकोले, जि. नगर) येथील. शेतकरी कुटुंबात जन्मलेला हर्षवर्धन वयाच्या अकराव्या वर्षी बलकवडे व्यायामशाळेत दाखल झाला. त्याने भगूरच्या ति. झं. विद्यामंदिरमध्ये शालेय शिक्षण करत गोरखनाथ बलकवडे, त्यांचा मुलगा विशाल, राम परिहार या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे डाव खेळण्यास सुरवात केली. त्यानंतर देवळाली कॅम्पच्या एस.व्ही.के.टी. महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. दरम्यान, तो सैन्यदलात दाखल झाला. मात्र, कुस्तीचे प्रेम त्याला गप्प बसू देत नव्हते. तो सैन्यदलातून पुन्हा भगूरला परतला आणि पुढील शिक्षणासाठी त्याने कळवण तालुक्‍यातील महाविद्यालयात प्रवेश घेतला. 

बदामाची थंडाई आवडते 
बदामाची थंडाई हर्षवर्धनला आवडते. तो शाकाहार आणि मांसाहार मनापासून घेतो. चिकन आणि मटण त्याचे आवडीचे आहे. त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसेच राष्ट्रीय विद्यापीठ ग्रीक रोमन कुस्तीत विजेतेपद मिळविले आहे. दोन महाराष्ट्र केसरी, एक जागतिक कुस्ती विजेत्या कुस्तीगिराला आस्मान दाखविल्याने हर्षवर्धन "चांदीची गदा' जिंकणार, अशी भावना नाशिकच्या कुस्तीगिरांमध्ये होती. त्याचे वजन 90 ते 92 किलोपर्यंत पोचल्याने या वजनगटातील कुस्तीगिरांसोबत सराव करण्यासाठी हर्षवर्धन दीड वर्षापूर्वी काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळू लागला होता. 

भगूरने दिला आत्मविश्‍वास 
व्यायामात कसूर न करण्याचा हर्षवर्धनचा स्वभाव राहिला. आखाड्यात खेळताना तो घाबरत नव्हता. कुणाशीही खेळ म्हटले, की तो खेळायचा. मग जोड मोठी आहे म्हणून तो मागे सरकला नाही. त्यातूनच भगूरमध्ये त्याचा आत्मविश्‍वास वाढला. मनोधैर्य उंचावले होते, अशी आठवण त्याचे गुरू गोरखनाथ बलकवडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितली. 

नाना तुमचं स्वप्न पूर्ण केलं! 
महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकल्यानंतर कर्नाटकमध्ये असलेले  बलकवडे यांच्याशी हर्षवर्धनने भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. त्याबद्दल सांगताना बलकवडे म्हणाले, की "नाना तुमचं स्वप्न पूर्ण केलं' असा आनंदभाव हर्षवर्धनने बोलताना मांडला. भारावून गेला होता. बोलताना त्याचे आनंदाश्रू वाहत असल्याचे जाणवत होते. हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण राहिला. कुस्तीने सगळे काही दिले. नाशिक जिल्ह्याने भरभरून प्रेम दिले. त्यामुळे मानाची "चांदीची गदा' जिल्ह्याला मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आमच्या आखाड्याच्या वाटचालीचे सोने झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com