esakal | नाशिक जिल्ह्यात २४ तासांत सर्वत्र वरुणराजाची मेहरनजर! 8 प्रकल्प 'फुल्ल'
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक जिल्ह्यात २४ तासांत सर्वत्र वरुणराजाची मेहरनजर!

नाशिक जिल्ह्यात २४ तासांत सर्वत्र वरुणराजाची मेहरनजर!

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : नांदगाव (nandgaon flood) तालुक्यात पावसाने हाहाकार उडवत २४ तासांत १२३ मिलिमीटरची नोंद केली. २४ तासांत जिल्ह्यात सर्वत्र वरुणराजाने मेहरनजर केली. त्यामुळे धरणांमधील जलसाठ्यात एक टक्क्याने भर पडली असून, धरणे ६८ टक्के भरली आहेत. आळंदी, भावली, वालदेवी, कडवा, हरणबारी, केळझर, नाग्या-साक्या, माणिकपुंज ही धरणे पूर्ण भरली आहेत. गंगापूरमध्ये ९२, दारणामध्ये ९५ आणि चणकापूरमध्ये ९३ टक्के जलसाठा आहे.

धरणसाठ्यात वाढ; आठ प्रकल्प ‘फुल’

पावसाने यंदा चिंता वाढवली होती. त्यातच पावसाचे आगमन झाल्याने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील नुकसानीत भर पडली. बुधवारी (ता. ८) सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः नाशिक- १६, इगतपुरी- २१, दिंडोरी- २९, पेठ- ४६.२, त्र्यंबकेश्‍वर- २२, मालेगाव- ३३, सिन्नर- ५४, येवला- ५१, चांदवड- १७, कळवण- ३३, बागलाण- ४६.६, सुरगाणा- ६९.१, देवळा- १५, निफाड- ५३. ही परिस्थिती एकीकडे असली, तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात अद्याप १५.२३ टक्क्यांचा ‘बॅकलॉक’ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७६.६७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ९१.९० टक्के पाऊस झाला होता. याशिवाय जिल्ह्यातील धरणांमध्ये अजूनही २० टक्क्यांनी जलसाठा कमी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ८८ टक्के धरणे भरली होती.

हेही वाचा: येवला तालुक्यातही पावसाचा कहर; सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

हेही वाचा: महिलेचा विनयभंग करणाऱ्या हायप्रोफाईल भोंदूबाबाला पोलिस कोठडी

loading image
go to top