esakal | जिवंतपणीच पोरांनी स्मशानात ठेवलेल्या 'बाबांना' अखेर मिळाले हक्काचे घर! नागरिकांमध्ये समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

senior citizen

पोलिस आयुक्तांच्या मदतीने 'बाबांना' मिळाली मायेची सावली!

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : बापाला आपल्या पोटच्या पोरांनी जिवंतपणीच मरणाअगोदर स्मशानभूमीत आणून ठेवले होते. याला ‘सकाळ’ने वाचा फोडली होती. त्यामुळे महाराष्ट्रात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी नागरिकांच्या त्या मुलांबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. (help-of-Commissioner-of-Police-senior-citizen-got-home-jpd93)

जिवंतपणीच मरणाअगोदर स्मशानभूमीत

रामभाऊ अवचार (वय ८१) यांना आपल्या पोटच्या पोरांनी जिवंतपणीच मरणाअगोदर स्मशानभूमीत आणून ठेवले होते. याला ‘सकाळ’ने वाचा फोडली होती. त्यामुळे महाराष्ट्रात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी नागरिकांच्या त्या मुलांबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत बाबांना मायेचा आधार दिला. त्यांना स्मशानभूमीतून बाहेर काढून कोरोना टेस्ट, दाढी-कटिंग, अंघोळ घालून अंगावर नवीन कपडे, पायात चप्पल, डोक्यावर टोपी परिधान केली होती. एवढेच नव्हे, तर त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या बातमीचा समाजमनावर गंभीर परिणाम झाला होता. त्यामुळे बाबांचे पुढे काय झाले, याची वारंवार भ्रमणध्वनीवरून चौकशी होत होती. अखेर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी ‘मुलगा बापाला वागविण्यास तयार नसेल, तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा,’ असे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. एवढेच नव्हे, तर नाशिक शहरातील आई-वडील व ज्येष्ठ व्यक्तींना जो कोणी त्रास देत असेल, त्यांच्यावर जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करा, असे आदेश पांडे यांनी काढले होते.

सकाळ’च्या बातमीची दखल

कायद्याचा बडगा उगारताच त्या बाबाच्या मुलाने अखेर वडिलांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शविली आणि अखेर त्या बाबांना आपल्या कुटुंबीयांमध्ये राहण्याचा योग आला. ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेऊन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी कायद्याचा बडगा उगरताच अखेर ‘त्या’ पोटच्या मुलाने स्मशानभूमीत जीवन व्यथित करणाऱ्या जन्मदात्या बापाला आपल्या कुटुंबीयांसोबत घेऊन जाण्याचे कर्तव्य पार पाडले. नागरिक व ‘सकाळ’च्या वाचकांनी समाधान व्यक्त केले. बाबांच्या बातमीसंदर्भात महाराष्ट्रातील वाचकांनी संवेदना प्रकट केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी, मंत्री जयंत पाटील यांचे स्वीय सहाय्यक, मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे, स्वीय सहाय्यक व सोशल मीडिया समन्वयकांनी चौकशी केली. तसेच पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुर्डे, सुमीत शर्मा आदींची मदत झाली.

हेही वाचा: राज्याचे लक्ष लागलेला 'तो' विवाह सोहळा अखेर रद्द!

रामभाऊ अवचार यांना त्यांचा मुलगा गुलाब अवचार याने सांभाळण्याची जबाबदारी दर्शविली आहे. त्याप्रमाणे बाबांना कुटुंबीयांकडे सोपविले आहे. मुलाने सांभाळण्याची जबाबदारी दर्शविल्याने त्यांच्यावरचा होणारा गुन्हा सध्या तरी टळला आहे. -कुमार चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड

‘सकाळ’ने खऱ्या अर्थाने बाबांना न्याय मिळवून दिला आहे. अशा प्रकारच्या पत्रकारितेची सध्या समाजाला गरज आहे. यामुळे समाजाला न्याय मिळण्यास सोपे जाणार आहे. समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम खऱ्या अर्थाने ‘सकाळ’ करीत आहे. मनस्वी अभिनंदन. -योगेश गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते

‘सकाळने बाबांचा प्रश्न मांडताच पहिल्यापासून शेवटपर्यंत बाबांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्यच मानतो. अखेर बाबांना स्वतःचे कुटुंब मिळाले. याबाबत ‘सकाळ’चे मनापासून आभार. -सुमीत शर्मा, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा: विकेंडला नाशिककरांची त्र्यंबकेश्वर, अंबोली घाटात मांदियाळी

loading image