esakal | नाशिक विभाग २०३० नव्हे २५ मध्येच हिवताप मुक्त होणार!

बोलून बातमी शोधा

malaria situation in nashik section
नाशिक विभाग २०३० नव्हे २५ मध्येच हिवताप मुक्त होणार!
sakal_logo
By
प्रशांत कोतकर

नाशिक : प्रतिबंधात्मक कार्यवाही योग्य पद्धतीने केल्याने नाशिक विभागाने हिवताप (मलेरिया) मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. २००८ मध्ये सहा हजार २४४ असलेली मलेरिया रुग्णसंख्या २४ एप्रिल २०२१ ला एकवर आली आहे. परिणामी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मलेरिया प्रतिबंध औषधांना मागणी वाढल्याचे चित्र आज औषधी विक्रत्यांकडे दिसत आहे.

समूळ औषधोपचाराने हमखास नियंत्रण

प्रामुख्याने किटकजन्य आजारात मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया व हत्तीरोग यांसारख्या आजारांचा समावेश होतो. एक वेळ अशी होती, की मलेरियाच्या साथीने सर्वत्र थैमान घातले होते. यात अनेकांचे बळीसुद्धा गेले. मलेरियावर वेळीच समूळ औषधोपचार घेतल्यास हमखास नियंत्रण मिळविता येते. हे लक्षात घेत नाशिक विभागात नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार व धुळे असे एकूण पाच जिल्हे असून, यात ४३१ ठिकाणी मलेरिया चिकित्सालय व उपचार केंद्र निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्यावर नियंत्रणासाठी या सर्व केंद्रांवर नियंत्रणासाठी नाशिक विभाग सहाय्यक संचालक (हिवताप) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

मलेरियाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट

या आजाराचे रुग्ण व मृत्यूचे प्रमाण पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी नाशिक विभागातील ५४ तालुक्यांत प्रशासनातर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती, विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व अजून राबविण्यात येत आहेत. १२ वर्षांच्या कालावधीत मलेरियाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली असून, एकही व्यक्तीचा मलेरियाने मृत्यू झालेला नाही. यामुळे २००८ पासून २०२० मध्ये हिवताप रुग्णांचे प्रमाण वर्षनिहाय घटत असल्याचे दिसून आले आहे. २००८ मध्ये सहा हजार २४४ असलेली हिवताप रुग्णसंख्या २०२० मध्ये ३०, तर जागतिक हिवताप दिनाच्या पूर्वसंध्येला एका रुग्णाची नोंद तेही नाशिक जिल्ह्यात झाली आहे.

हेही वाचा: पासपोर्ट सेवा केंद्रांचे काम स्थगित; राज्य सरकारचा आदेश

आकडे बोलतात : नाशिक विभाग

वर्षनिहाय रुग्णसंख्या

२०१६ - ६१९ (रुग्णसंख्या)

२०१७ - ३१२

२०१८ - ९४

२०१९ - ४६

२०२० - ३०

मलेरिया आजाराबाबत नाशिक विभागात पाच वर्षांत प्रभावी जनजागृत्ती व उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केली आहे. परिणामी रुग्णांची संख्या घटली आहे. २०२५ पर्यंत नाशिक विभाग मलेरियामुक्त होईल, असा विश्‍वास आहे.
-डॉ. पी. डी. गांडाळ सहाय्यक संचालक (हिवताप)

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..