esakal | पिंपळगाव बाजार समितीत बेदाणा लिलाव ठप्प; दर गडगडले, निर्यातही नाही!

बोलून बातमी शोधा

raisin
पिंपळगाव बाजार समितीत बेदाणा लिलाव ठप्प; दर गडगडले!
sakal_logo
By
दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उसळी घेतल्याने बेदाणा व्यापार पुन्हा बाधित झाला आहे. महिन्याभरापासून पिंपळगाव (Pimpalgaoan) बाजार समितीतील बेदाणा लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवले आहेत. उत्पादनात यंदा २० टक्के घट झाली असली तरी परदेशात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या जोखडात बेदाणा अडकला आहे. निर्यात ठप्प व देशांतर्गत उठाव नसल्याने बेदाण्याचे दर ७५ रुपये प्रतिकिलोच्या पुढे सरकले नाहीत. बेदाणा दराची पापडी झाली आहे. (In Pimpalgaon Market Committee Currant auction stalled)

कोरोनामुळे एप्रिलमध्ये लॉकडाउनची कुऱ्हाड कोसळली. द्राक्षांचे दर कोसळल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी उपउत्पादन असलेल्या बेदाण्यासाठी द्राक्षबागा दिल्या. तरीही दर वर्षीपेक्षा २० टक्के कमी बेदाणा नाशिक जिल्ह्यात तयार झाला. तब्बल २८ हजार टन बेदाण्याची निर्मिती झाली. एक किलो बेदाणानिर्मितीसाठी द्राक्षमणी, रसायने असा ५० ते ५५ रुपये खर्च आला. पिंपळगाव बाजार समितीत सुरू असलेल्या बेदाणा लिलावात सरासरी ७५ रुपये दर मिळतो आहे. खर्च व मिळणारा भाव पाहता बेदाण्याचा व्यवसाय आतबट्‍ट्याचा धंदा ठरतो आहे.

हेही वाचा: घोटी रुग्णालयाचे दुखणे कायम! जुन्या-नव्याचा मेळ बसेना

कोरोनाचे वादळ जगभर घोंगावत असल्याने बेदाण्याची निर्यात ठप्प आहे. रशिया, युरोप, युक्रेन, मलेशिया, कोलंबो, सौदी अरबिया या देशांत लॉकडाउन, बाजारपेठा बंद असल्याने नाशिकचा पिवळा पाचू परदेशात पोचू शकत नाही. देशांतर्गत काही प्रमाणात लॉकडाउन होण्याची भीती असल्याने व्यापाराची घडी अजूनही विस्कटलेली आहे. त्यामुळे बेदाणा व्यापाऱ्यांनी महिनाभरापासून पिंपळगाव बाजार समितीत लिलाव बंद ठेवले आहेत. मागणीअभावी बेदाण्याचे दर गडगडले आहेत. रमजान महिनाही १५ दिवस अगोदर आल्याने बेदाण्याची मागणी होऊ पाहणारी वाढ थांबली आहे. बेदाणा उत्पादक सलग दुसऱ्या वर्षी संकटात सापडला आहे.

निर्यात ठप्प व देशांतर्गत मागणी नसल्याने बेदाण्याला उठाव नाही. शिवाय अगोदर खरेदी केलेला बेदाणा शीतगृहात पडून आहे. त्यामुळे नव्याने बेदाणा खरेदी करता येत नाही.

- शीतलकुमार भंडारी, बेदाणा व्यापारी

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला दिलेले 'ते' आश्वासन आज पूर्ण!