
नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित शहर बस वाहतुकीचे दर कमी ठेवल्यास भविष्यात पायंडा पडून आर्थिक तोटा अधिक वाढण्याची भीती व्यक्त करताना दोन किलोमीटरला पाच रुपयांनी दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक महापालिका परिवहन समितीची मंगळवारी (ता. २९) बैठक झाली. त्यात बस प्रवासाचे दर कमी ठेवण्यास विरोध करण्यात आला.
शहर बससेवेसाठी परिवहन समितीचा निर्णय; आर्थिक तोट्याची भीती
महापालिका आयुक्त कैलास जाधव, एसटीचे विभाग नियंत्रक नितीन मेंद, महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, शहर अभियंता संजय घुगे, लेखाधिकारी नरेश महाजन, लेखापरीक्षक बी. व्ही. सोनकांबळे, स्मार्टसिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थविल आदी उपस्थित होते. बस कंपनीचा मागील वर्षाचा ताळेबंद सादर करण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा तोट्यात असल्याचे कारण देत चालविण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रॉस कॉस्टकटिंग तत्त्वानुसार पहिल्या टप्प्यात अडीचशे बस सुरू केल्या जातील. त्यासाठी पायाभूत सुविधा महापालिका पुरविणार आहे. बस पुरविण्यासाठी ठेकेदार कंपन्यांची नियुक्ती, ऑपरेटर, चालक-वाहकांची नियुक्ती महापालिका करणार आहे. तिकीट वसुलीसाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली जाईल. किलोमीटरमागे बस कंपन्यांना ठराविक रक्कम अदा केली जाणार आहे. सीएनजी १००, तर ५० इलेक्ट्रिकल बस चालविल्या जाणार आहेत.
एसटीपेक्षा बसचे जादा दर
राज्य परिवहन महामंडळामार्फत सध्या चार किलोमीटरला दहा रुपये असा प्रवासी दर आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर महापालिका दर चार किलोमीटरला पाच रुपये दर ठेवणार होती. परंतु सुरवातीला कमी दर ठेवल्यास भविष्यात नगरसेवक दर वाढू देणार नाहीत. त्यामुळे बससेवा आणखी तोट्यात जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली. म्हणून पहिल्या दोन किलोमीटरला एसटीप्रमाणेच दहा रुपये प्रतिप्रवासी दर, तर त्यापुढे दर दोन किलोमीटरला पाच रुपयांनी वाढ होणार आहे.
शहराबाहेरही धावणार बस
प्रजासत्ताक दिनापासून बससेवा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. बससेवेचे प्रवासी दर निश्चित करताना उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहराबाहेर बससेवा नेण्याचा विचार करण्यात आलेला आहे. शहरातील प्रमुख मार्गाने बरोबरच भगूर, त्र्यंबकेश्वर, ओझर तसेच शहराच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागात बससेवा पोचविली जाणार आहे. या माध्यमातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
असे असतील प्रवासी दर >>>
०-२ किलोमीटरला | १० रुपये |
२-४ किलोमीटरला | १५ रुपये |
४-६ किलोमीटरला | २० रुपये |
६-८ किलोमीटरला | २५ रुपये |
८-१० किलोमीटरला | २५ रुपये |
१०-१२ किलोमीटरला | ३० रुपये |
(लहान मुलांसाठी निम्मे तिकीट दर असतील.) |
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.